पोलीस अधिकाऱ्याने वाल्मिक कराडच्या पायावर गोळी झाडली?, ‘त्या’ दिवशी काय घडलं?

On: December 14, 2025 4:12 PM
Valmik Karad
---Advertisement---

Valmik Karad | बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी म्हणून वाल्मीक कराड (Valmik Karad) सध्या तुरुंगात आहे. दरम्यान, वाल्मीक कराडने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

मागील वर्षभरापासून अटकेत-

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडवर केज पोलीस ठाण्यात मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि तो गेल्या वर्षभरापासून अटकेत आहे. त्याने दाखल केलेल्या या जामीन अर्जावर आता १६ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

परळीच्या राजकारणात वाल्मीक कराडचा कसा होता प्रभाव?

मूळचा परळी तालुक्यातील असलेल्या वाल्मीक कराडचा जन्म पांगरी गोपीनाथ गड गावच्या एका शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले आणि पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी परळी गाठले. उदरनिर्वाहासाठी तो परळीतून भाड्याने व्हीसीआर आणून गावच्या जत्रेत सिनेमे दाखवून तिकीटातून पैसे कमवत असे. याच काळात, वाल्मीकचा संपर्क दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू असलेले फुलचंद कराड यांच्याशी आला. फुलचंद कराड यांनी वाल्मीकला गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरगडी म्हणून कामाला लावले.

सभेत तुफान हाणामारी-

मुंडे यांच्या घरी भाजीपाला, किराणा सामान आणि घरातील छोटी-मोठी कामे करत असताना वाल्मीकने गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास संपादन केला. हळूहळू, वाल्मीक कराडला परळीतील थर्मल प्लँटमध्ये कंत्राटे मिळू लागली. मुंडे यांचे नाव त्याच्या पाठीशी असल्याने परळीत त्याचा प्रभाव वाढत गेला. १९९५ मध्ये झालेल्या वैद्यनाथ महाविद्यालयाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी झालेल्या सर्वसाधारण सभेत तुफान हाणामारी झाली. याच दरम्यान, तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोजे यांनी झाडलेली गोळी वाल्मीकच्या पायाला लागली. या घटनेमुळे गोपीनाथ मुंडे यांचा त्याच्यावरील विश्वास अधिकच वाढला.

सत्ता आणि वर्चस्वाचे राजकारण

गेल्या दहा वर्षांत बीडच्या राजकारणात धनंजय मुंडे यांचा दबदबा वाढल्यामुळे वाल्मीक कराडचे वर्चस्व देखील वाढले. बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी कोण असावा, याचे निर्णयही वाल्मीकच्या मर्जीने होऊ लागले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, गेल्या वर्षी ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली. यानंतर वाल्मीक फरार होता, परंतु त्याने नंतर यंत्रणेसमोर आत्मसमर्पण केले. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांची कन्या वैभवी देशमुख यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या आहेत.

News Title – what happened with valmik karad?

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now