Weather Update | राज्यात मागील २४ तासांत विविध भागांमध्ये हवामानात बदल पाहायला मिळाले. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण राहिले, तर विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा जोर अधिक जाणवला. तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा
विदर्भातील अकोला आणि मालेगावात तापमानाने चाळीशीचा टप्पा पार केला असून, ४३ ते ४४ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने नागरिकांची चांगलीच होरपळ होत आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांमध्ये राज्यात पुन्हा हवामान बदल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः विदर्भाच्या पूर्व भागात उन्हाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे विदर्भात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पुढील तीन दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत गारपीटही होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दक्षिण महाराष्ट्रातही पावसाची चिन्हं-
रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचे लक्षण आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात सलग तीन दिवस उष्णतेचा तडाखा सहन केल्यानंतर गुरुवारी तापमानात थोडीशी घट झाली. मात्र, ही स्थिती तात्पुरती असून, पुढील तीन दिवस तापमान पुन्हा वाढणार असल्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी सरासरीपेक्षा तापमान अधिक राहणार आहे.






