Rain Alert | महाराष्ट्रात मान्सूनचा निरोप झाल्यानंतरही हवामानात पुन्हा एकदा बदलाची चिन्हं दिसू लागली आहेत. दिवसभर प्रखर ऊन आणि सायंकाळी थंडीची चाहूल अशी स्थिती असताना आता पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. लक्षद्वीप, केरळ आणि दक्षिण कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Rain Alert)
उन्हाचा चटका वाढलेला असतानाच या अनपेक्षित पावसामुळे काही भागात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र शेती आणि पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. हवामान विभागाने कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात यलो अलर्ट जारी केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण :
नैऋत्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती कोमोरीन भागाकडे सरकत असल्याने कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता वाढली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. आज कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
गुरुवारी सिंधूदुर्ग, रायगड, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि नंदुरबार या जिल्ह्यांत तुरळक सरी पडू शकतात. (Maharashtra Rain Alert)
Rain Alert | तापमानात घट होण्याची शक्यता – मॉन्सूनचा निरोप अंतिम टप्प्यात
शुक्रवारीही पावसाची शक्यता कायम राहणार असून पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विजांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, ठाणे, पुणे, सातारा, सांगली आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात. हवामान विभागानुसार, या पावसामुळे तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 32 अंशांच्या पुढे गेलेलं आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आज आणि उद्या थोडासा दिलासा मिळू शकतो. दरम्यान, मॉन्सूनचा परतीचा प्रवास अंतिम टप्प्यात असून, आजपासून देशभरातून दक्षिण-पश्चिम मान्सून माघारी जाणार आहे. त्याच वेळी दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (Northeast Monsoon) सक्रिय होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.






