Thane Water Cut | उन्हाळ्याची सुरुवात होत असतानाच ठाणे आणि पनवेल परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विविध तांत्रिक कामांमुळे या दोन्ही शहरांमध्ये काही काळासाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काही भागात 24 तास तर काही ठिकाणी तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे अनेक भागातील नागरिकांना याचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे.
ठाण्यात 24 तास पाणीपुरवठा बंद :
ठाणे महापालिकेकडून जलवाहिनीच्या कामासाठी विशेष शटडाऊन घेण्यात येणार आहे. गुरुवार 12 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून शुक्रवार 13 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत ठाण्यातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Thane Water Cut News)
उथळसर प्रभाग समितीच्या अंतर्गत नवीन जलवाहिनीचे काम सुरू आहे. खोदकामादरम्यान जलकुंभाच्या 600 मिमी व्यासाच्या आउटलेट पाइपलाइनला अडथळा निर्माण होत असल्यामुळे ही जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या कामामुळे सिद्धेश्वर तलाव परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी परिसर, पाचपाखाडी, सरोवर दर्शन, चंदनवाडी, हंसनगर, सिंगनगर, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलार पाडा, गोकुळदासवाडी, कोलबाड आणि गोकुळनगर या भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. तसेच नौपाडा प्रभागातील पाचपाखाडी, चरई, धोबीआळी आणि महानगरपालिका परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Thane Water Cut | पनवेलमध्ये 36 तास पाणीपुरवठा बंद :
दरम्यान Panvel Municipal Corporation क्षेत्रात न्हावा-शेवा उपप्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि नवीन जलवाहिनी सुरू करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार 12 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून शुक्रवार 13 मार्च रोजी रात्री 9 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण 36 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. (Panvel Water Cut)
या शटडाऊनचा परिणाम कळंबोली, नवीन पनवेल, पनवेल शहर, खांदेश्वर, करंजाडे आणि नावाडे या भागांसह सिडको वसाहतींवर होणार आहे. तसेच डेरीवली, वडघर, विचुंबे, उसर्ली, बेलवली-बारदोली आणि नांदगाव-कुडाळे या गावांमध्येही पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. (Panvel Water Supply Shutdown)
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन दिवस काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






