Walmik Karad | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात महत्त्वाचा खुलासा झाला असून, मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) हाच हत्येचा सूत्रधार असल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे. वाल्मिक कराडला मुख्य आरोपी म्हणून तर विष्णू चाटे (Vishnu Chate) याला आरोपी क्रमांक दोन म्हणून नमूद करण्यात आले आहे.
हत्या, खंडणी आणि ॲट्रॉसिटी प्रकरण एकत्रित-
या प्रकरणात हत्या, खंडणी आणि ॲट्रॉसिटी हे तीनही गुन्हे वेगवेगळे नसून एकमेकांशी जोडलेले आहेत, असे सीआयडी (CID) तपासातून समोर आले आहे. त्यामुळे या तिन्ही घटनांचा एकत्रित तपास करून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, ही हत्या खंडणीच्या व्यवहारातून घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
“जो आड येईल त्याला सोडायचं नाही”-
आरोपपत्रातील माहितीनुसार, ६ तारखेला संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले (Sudarshan Ghule), प्रतीक घुले (Pratik Ghule) यांच्यात वाद झाला होता. हा वाद आवादा कंपनीच्या परिसरात घडला आणि त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर ७ तारखेला सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केला.
यावेळी वाल्मिक कराडने घुलेला आदेश दिला – “जो उठेल आणि आपल्या आड येईल, त्याला कोणीही सोडायचं नाही.” यानंतर सुदर्शन घुलेने आवादा कंपनीत फोन करून धमकी दिल्याची नोंद पोलिसांनी केलेल्या आरोपपत्रात करण्यात आली आहे.
“संतोष देशमुख आडवा आला तर कायमचा धडा शिकवा”
8 तारखेला विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि एका गोपनीय साक्षीदाराची नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यावेळी वाल्मिक कराडचा निरोप देण्यात आला – “संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा.”
याच बैठकीत “आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर त्याचे परिणाम काय होतात, हा संदेश इतरांना द्या” असेही सांगण्यात आले होते. या साक्षीदाराच्या जबाबावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात धागेदोरे जोडत वाल्मिक कराड आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा केले आहेत.






