Walmik Karad | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात संताप उसळला होता. या प्रकरणात सध्या वाल्मिक कराड (Walmik Karad) कारागृहात आहे. आता त्याच्याशी संबंधित आणखी एका हत्येच्या तपासात महत्त्वाची घडामोड समोर आली असून, त्यामुळे त्याच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात नवा जबाब :
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणाला दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. या गुन्ह्यात वाल्मिक कराडवर आरोप ठेवण्यात आले आहेत. तपासादरम्यान विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा गोपनीय जबाब नोंदवण्यात आला आहे. दंड प्रक्रिया संहिता कलम 164 अंतर्गत दिलेला हा जबाब तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (Walmik Karad News)
मिळालेल्या माहितीनुसार, विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी आपल्या निवेदनात वाल्मिक कराड याच्यासोबतच त्याच्या मुलाचेही नाव घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी महादेव मुंडे (Mahadeo Munde) यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.
Walmik Karad | नार्को टेस्ट आणि वाढत्या अडचणी :
दरम्यान, या गुन्ह्याशी संबंधित दोन संशयितांची आज नार्को चाचणी घेण्यात येत आहे. या चाचणीतून विशेष तपास पथकाला (SIT) कोणती माहिती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपास यंत्रणा या सर्व बाबींची छाननी करत असून पुढील कारवाईची दिशा या अहवालांवर अवलंबून राहणार आहे.
सध्या वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यावर आधीच गंभीर आरोप असताना, महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नव्या जबाबामुळे त्याच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपासातील पुढील घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.






