बीड: मस्स्जोग (Massajog, Beed) येथील गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून बीड जिल्हा कारागृहातील कोठडीत असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) यांना कारागृहातील इतर दोन कैद्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महादेव गित्ते (Mahadev Gitte) आणि अक्षय आठवले (Akshay Athawale) अशी मारहाण करणाऱ्या कैद्यांची नावे असून, वाल्मिक कराड यांनी आपल्याला एका खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे बीड जिल्हा कारागृहातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी या मारहाणीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे जेल प्रशासनाने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
कारागृहात नेमकं काय काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्हा कारागृहात (Beed District Jail) वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी हल्ला चढवला. गित्ते आणि आठवले यांचा आरोप आहे की, वाल्मिक कराड यांच्यामुळे त्यांना एका खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे. याच संतापातून त्यांनी कराड आणि त्यांच्यासोबत असलेल्या घुले यांना लक्ष्य केले. दोन-चार चापटा मारल्याचे सांगण्यात येत आहे, या घटनेची पुष्टी स्वतः आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
या घटनेनंतर आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, “वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड कारागृहात (Beed Jail) मारहाण झाल्याची घटना खरी आहे. या दोघांच्या जीवाला आता कारागृहात धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना तात्काळ बीड कारागृहातून नागपूर (Nagpur) किंवा अमरावती (Amravati) येथील मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात यावे, अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे. यामुळे भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि त्यांच्या जीविताला असलेला धोका कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
कारागृह प्रशासनाचा हलगर्जीपणा?
विशेष म्हणजे, मारहाणीची घटना घडण्यापूर्वी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि दुसरीकडे महादेव गित्ते, अक्षय आठवले यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमकी झाल्या होत्या, अशी माहिती समोर येत आहे. या दोन्ही गटांमधील तणाव आणि वैर कारागृह प्रशासनाला ज्ञात होते. असे असतानाही प्रशासनाने वेळीच योग्य ती खबरदारी का घेतली नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. जर त्यांच्यातील वाद प्रशासनाला माहीत होता, तर त्यांना वेगवेगळ्या बॅरेकमध्ये का ठेवण्यात आले नाही किंवा त्यांच्यावर कडक नजर का ठेवण्यात आली नाही, याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. कारागृह प्रशासनाच्या संभाव्य हलगर्जीपणामुळेच ही गंभीर घटना घडल्याचा आरोपही केला जात आहे.
या मारहाणीची तीव्रता किती होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर मारहाण किरकोळ असेल, तर कदाचित अंतर्गत चौकशी केली जाईल. मात्र, जर वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना गंभीर दुखापत झाली असेल, तर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले जाईल का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. एकंदरीत, बीड जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये झालेली ही मारहाणीची घटना अत्यंत गंभीर असून, यामुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






