बीड हादरलं! संतप्त जमावाने बसवर केली दगडफेक; अनेक प्रवासी जखमी

On: October 14, 2025 6:43 PM
Beed Kej Protest
---Advertisement---

Beed Kej Protest | बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात आज (मंगळवार) सकाळी रास्ता रोको आंदोलनाने हिंसक वळण घेतले. साठवण तलाव मंजूर करण्याच्या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या दिला होता. मात्र काही वेळातच परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि आंदोलक आक्रमक झाले. संतप्त जमावाने महामंडळाच्या बस गाड्यांवर दगडफेक केली. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (Beed Kej Protest)

केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात झालेल्या या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला. बीड-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर तासन्‌तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक मागण्या मान्य न झाल्याने हटण्यास तयार नव्हते.

आंदोलकांचा आक्रमक पवित्रा; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज :

पोलिसांनी मध्यस्थी करूनही परिस्थिती नियंत्रणात आली नाही. काही आंदोलनकर्त्यांनी अचानक एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक सुरू केली. काही बसेसची काच फुटली तर काही वाहनांचे गंभीर नुकसान झाले. दगडफेकीत प्रवासी जखमी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमी प्रवाशांना तत्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Beed Kej Protest)

दगडफेकीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर आंदोलकांनी घटनास्थळ सोडले आणि वातावरण काही प्रमाणात शांत झाले. मात्र या घटनेमुळे केज शहरात तणावपूर्ण वातावरण कायम आहे.

Beed Kej Protest | “साठवण तलाव मंजूर करा, नाहीतर आंदोलन सुरूच राहील” :

आंदोलनकर्त्यांनी कोरडेवाडी परिसरात साठवण तलाव मंजूर करण्याची मागणी केली होती. या मागणीवर तोडगा न निघाल्यास पुन्हा मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तीन तासाहून अधिक काळ चाललेल्या या आंदोलनामुळे अनेक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने घटनेनंतर तातडीने अहवाल मागवला असून नुकसानग्रस्त बसेसचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

News Title: Violence erupts in Beed’s Kaij: Protest turns violent, buses attacked with stones, several passengers injured

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now