Vinod Kambli Health Update | भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार फलंदाज विनोद कांबळी यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांचा भाऊ वीरेंद्र कांबळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळींना सध्या नीट बोलता आणि चालता येत नाही. जरी ते सध्या घरी असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले गेले तरी त्यांच्यावर उपचार सुरूच आहेत. “तो एक चॅम्पियन आहे, नक्कीच पुनरागमन करेल. त्याला चाहत्यांच्या प्रार्थनेची आणि पाठिंब्याची गरज आहे,” असे भावनिक आवाहन वीरेंद्र कांबळींनी केले आहे. (Vinod Kambli Health Update)
गंभीर आजारपणाची समस्या :
काही महिन्यांपूर्वी विनोद कांबळींना लघवीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तपासणीत त्यांच्या मेंदूत गाठ आढळली होती. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असला तरी त्यांचे आरोग्य पूर्णपणे सुधारलेले नाही. गेल्या काही दिवसांत त्यांना पुन्हा बोलणे आणि चालणे कठीण झाले आहे.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, कांबळींना एकाच वेळी अनेक आरोग्य समस्या जाणवत आहेत. लघवीचा संसर्ग, मेंदूत रक्ताच्या गुठळ्या आणि मज्जासंस्थेवर परिणाम करणाऱ्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती धोकादायक बनली आहे. बोलण्यात आणि चालण्यात अडचण, अशक्तपणा आणि थकवा ही लक्षणे त्यांच्या आरोग्यासाठी चिंतेची बाब आहेत. योग्य वेळी आणि सातत्याने उपचार न झाल्यास मूत्रपिंड निकामी होणे, स्ट्रोक किंवा कायमस्वरूपी आरोग्य हानी होऊ शकते, असा वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा आहे.
Vinod Kambli Health Update | क्रिकेट कारकीर्दीतली सुवर्णकाळ :
विनोद कांबळी हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात टॅलेंटेड पण दुर्दैवी खेळाडूंपैकी एक मानला जातो. 1993 ते 2000 दरम्यान त्याने भारतासाठी 17 कसोटी सामने आणि 104 एकदिवसीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा सर्वात वेगवान भारतीय फलंदाज हा विक्रम आजही कांबळींच्या नावावर आहे.
कांबळींनी कसोटी क्रिकेटमध्ये 54.20 च्या सरासरीने 1084 धावा केल्या असून त्यात चार शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी 32.59 च्या सरासरीने 2477 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि 14 अर्धशतकं आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कांबळींनी 129 सामन्यांत तब्बल 9965 धावा केल्या असून 35 शतके आणि 44 अर्धशतकं ठोकली आहेत. (Vinod Kambli Health Update)
चाहत्यांकडून प्रार्थनांचा वर्षाव :
विनोद कांबळींच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून प्रार्थनांचा वर्षाव सुरू झाला आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी आणि चाहत्यांनी त्यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. वीरेंद्र कांबळी म्हणाले, “तो एक लढवय्या आहे. मला खात्री आहे की तो पुन्हा उभा राहील, चालेल, धावेल आणि कदाचित पुन्हा मैदानावर दिसेल. त्याच्यासाठी प्रार्थना करा.”






