भीषण दुर्घटना! स्पीडबोट समुद्रात उलटली; 15 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू

On: July 11, 2026 5:25 PM
Vietnam Boat Accident
---Advertisement---

Vietnam Boat Accident | भारतीय नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट समुद्रात उलटून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला असून 21 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावासाने या वृत्ताला दुजोरा दिला असून बचाव आणि मदतकार्य पूर्ण करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पीडबोटमध्ये 32 भारतीय पर्यटक आणि चार कर्मचारी असे एकूण 36 जण होते. ही बोट होन मे रुट न्गोई बेटावरून एन थोई बंदराकडे परतत असताना फु क्वोक बेटापासून सुमारे 400 मीटर अंतरावर अचानक उलटली. अपघातानंतर सर्व प्रवासी समुद्रात फेकले गेले.

समुद्रातील प्रचंड लाटांमुळे दुर्घटना

स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी पाऊस नव्हता. मात्र समुद्रात मोठ्या आणि वेगवान लाटा होत्या. बोट उलटताच परिसरातील इतर बोटी मदतीसाठी धावून आल्या आणि तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र अनेक प्रवासी बोटीच्या आत अडकल्याने सुरुवातीला बचावकार्याला अडथळे आले. त्यानंतर बॉर्डर गार्ड, नौदल, कोस्ट गार्ड आणि इतर बचाव पथकांनी संयुक्तपणे शोधमोहीम राबवून सर्व प्रवाशांना बाहेर काढले.

15 जणांचा मृत्यू, 21 जणांची सुटका

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात दोन महिला आणि 13 पुरुष अशा एकूण 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. उर्वरित 21 जणांना सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याचा तपास सुरू आहे.

भारतीय दूतावासाकडून हेल्पलाईन सुरू

या दुर्घटनेनंतर व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने शोक व्यक्त करत पीडित कुटुंबांच्या मदतीसाठी हनोई आणि हो ची मिन्ह सिटी येथे विशेष कंट्रोल रूम सुरू केल्या आहेत. स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने भारतीय नागरिकांना आवश्यक ती कॉन्सुलर मदत पुरवली जात असल्याची माहिती दूतावासाने दिली आहे. तसेच संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

News Title: Vietnam Boat Accident Phu Quoc Indian Tourists Rescue 

Join WhatsApp Group

Join Now