Vice President Election | भारताच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक उद्या, ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. मागील महिन्यात तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेतली जात आहे. या वेळी सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट सामना आहे.
मतदार कोण? मतदानाची प्रक्रिया :
उपराष्ट्रपतीची निवड संसदेतल्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांमार्फत केली जाते. यामध्ये लोकसभा (५४३), राज्यसभा (२३३) आणि १२ नामनिर्देशित सदस्य, अशा मिळून ७८२ खासदारांचा समावेश असतो. मतदान गुप्त पद्धतीने, एकल हस्तांतरणीय मत (STV) प्रणालीद्वारे घेतले जाते.
उमेदवाराला वैध मतांच्या निम्म्याहून अधिक मते मिळणे बंधनकारक असते. जर पहिल्या पसंतीत बहुमत मिळाले नाही, तर कमी मते मिळालेल्या उमेदवाराची मते पुढील पसंतींमध्ये ट्रान्सफर केली जातात.
Vice President Election | कोणाचं समर्थन कोणाला? :
एनडीएकडे लोकसभेत मजबूत बहुमत असल्याने राधाकृष्णन यांचे पारडे जड मानले जाते. वायएसआर काँग्रेस आणि काही प्रादेशिक पक्षांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्रमुकशीही संपर्क साधला होता, पण त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.
दुसरीकडे, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप, समाजवादी पक्ष, राजद, डावे पक्ष, शिवसेना (यूबीटी) यांसह अनेक विरोधी पक्ष सुदर्शन रेड्डींच्या समर्थनार्थ एकवटले आहेत. एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनीही तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विनंतीवरून त्यांना पाठिंबा दिला आहे.
बहुमताची गणितं :
लोकसभेत एनडीएचे २९३ खासदार आहेत, तर राज्यसभेत त्यांची संख्या १३० इतकी आहे. नामनिर्देशित सदस्य धरून एनडीएकडे एकूण ४३५ खासदारांचे समर्थन आहे. निवडणुकीसाठी ७८३ खासदार मतदान करणार असून, बहुमतासाठी ३९२ मतांची गरज आहे. यामुळे आकड्यांच्या हिशोबाने एनडीएचा विजय निश्चित मानला जात आहे. मात्र, क्रॉस व्होटिंग किंवा अनपेक्षित घडामोडींमुळे निकालात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Vice President Election)
उमेदवारांची ओळख :
सी.पी. राधाकृष्णन – तामिळनाडूतील ज्येष्ठ भाजप नेते व महाराष्ट्राचे राज्यपाल. पक्षनिष्ठा आणि दक्षिण भारतात संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बी. सुदर्शन रेड्डी – आंध्र प्रदेशातील सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश. प्रामाणिक, निष्पक्ष आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची प्रतिमा आहे.
उद्याचा निर्णय ऐतिहासिक? :
उपराष्ट्रपती निवडणुकीत राजकारण आणि न्यायव्यवस्था या दोन भिन्न पार्श्वभूमीचे उमेदवार एकमेकांसमोर असल्याने ही लढत ऐतिहासिक मानली जात आहे.
एनडीएचे बहुमत भक्कम असले तरी विरोधी आघाडीचा एकजूटपणा आणि प्रचार मोहिम लक्षवेधी ठरली आहे. अखेर उद्या कोण उपराष्ट्रपतीपदी विराजमान होणार, याची उत्सुकता देशभर आहे.






