Vice Presidential Election | भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चेला उधाण आले होते. अखेर एनडीएने आपल्या उमेदवाराची घोषणा केली असून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना अधिकृतरित्या उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. (Vice Presidential Election)
रविवारी (17 ऑगस्ट) झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करताना सर्व सदस्यांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.
सी. पी. राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास :
सी. पी. राधाकृष्णन हे तामिळनाडूचे रहिवासी असून सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्याआधी त्यांनी झारखंड, तेलंगणा, पुद्दुचेरी अशा अनेक राज्यांचे राज्यपालपद भूषवले आहे. तसेच ते दोन वेळा भाजपचे खासदार राहिले आहेत.
1998 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी तब्बल 1.5 लाख मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 1999 च्या निवडणुकीतही त्यांनी सुमारे 55 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. याशिवाय ते तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष राहिले असून केरळमध्येही भाजप प्रभारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.
Vice Presidential Election | निवडणूक आयोगाचा कार्यक्रम निश्चित :
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने घटनेच्या अनुच्छेद 324 अंतर्गत सुरू केली आहे. ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा 1952’ व ‘निवडणूक नियमावली 1974’ नुसार या निवडणुका घेतल्या जातात. (Vice Presidential Election)
या निवडणुकीसाठी अधिसूचना 7 ऑगस्ट 2025 रोजी जारी झाली असून, नामांकन अर्जांची छाननी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट निश्चित केली आहे. मतदानाची व मतमोजणीची तारीख 9 सप्टेंबर 2025 अशी जाहीर करण्यात आली आहे. मतदान सकाळी 10 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 5 पर्यंत चालणार आहे.






