Bal Karve Death | मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे गुरुवारी (28 ऑगस्ट) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. मुंबईतील पार्ले येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकताच त्यांनी आपला 95 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कन्या स्वाती कर्वे यांनी सोशल मीडियावर दिली.
‘गुंड्याभाऊ’ म्हणून लोकप्रियता :
बाळ कर्वे यांनी नाटकं आणि मालिकांमधून अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. विशेषतः 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चिमणराव’ या मालिकेत ‘गुंड्याभाऊ’ ही भूमिका प्रचंड गाजली. या भूमिकेमुळे ते प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून राहिले. नंतर त्यांना लोक प्रत्यक्ष आयुष्यातही गुंड्याभाऊ म्हणूनच हाक मारू लागले. (Bal Karve Death)
त्यांनी विजया मेहता आणि विजया जोगळेकर-धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगभूमीवर पाऊल टाकले. ‘रथचक्र’, ‘तांदूळ निवडता निवडता’, ‘मनोमनी’, ‘आई रिटायर होते’, ‘कुसूम मनोहर लेले’ यांसारख्या नाटकांत त्यांनी प्रभावी भूमिका केल्या. त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांना नाटकात एक वेगळा जीवनानुभव मिळायचा.
Bal Karve Death | महानगरपालिकेतील दीर्घ कारकीर्द :
बाळ कर्वे यांचे पूर्ण नाव बाळकृष्ण कर्वे होते, परंतु ‘बाळ’ हेच नाव त्यांना लोकप्रियतेने लाभले. त्यांनी पुण्यातून सिव्हिल इंजिनीअरिंग पूर्ण केलं आणि मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून तब्बल 32 वर्षे नोकरी केली. नोकरीदरम्यान पार्ले येथे राहताना त्यांची सुमंत वरणगांवकर यांच्याशी ओळख झाली. या दोघांनी मिळून ‘किलबिल बालरंगमंच’ या संस्थेची स्थापना केली आणि बालनाट्यांच्या माध्यमातून मुलांना रंगभूमीकडे आकर्षित केलं.
बाळ कर्वे यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी, दूरदर्शन आणि नाट्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची गुंड्याभाऊ ही अजरामर भूमिका, नाटकांतील प्रभावी अभिनय आणि रंगभूमीवरील योगदान यामुळे ते नेहमीच मराठी प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.






