पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हगवणेने (Vaishnavi Hagawane) केलेल्या आत्महत्येप्रकरणी आता एक नवीन माहिती समोर आली आहे. जमीन खरेदीसाठी पैशाची मागणी पूर्ण न केल्याने वैष्णवीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिचा पती, सासू व नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशील हगवणे (Sushil Hagawane) यांनाही पुणे पोलिसांनी आता अटक केली आहे. या अटकेनंतर हगवणे घरातील मोठी सून, मयुरी हगवणे, हिने धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. तिने आपल्या पती सुशील हगवणेला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला असून, लवकरच अजित पवारांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.
मयुरीची प्रतिक्रिया
मयुरी हगवणेने माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, पोलिसांना अटक केल्यानंतर सुशील आणि राजेंद्र यांची चौकशी केली जाईल आणि योग्य ती कारवाई होईल. “मला तरी असं वाटत नाही की त्यांचा आधी बचाव होत होता. त्यांचे मित्र परिवार त्यांना मदत करत होते, साथ देत होते, त्यामुळे ते कदाचित पोलिसांपासून लपले असतील,” असे मयुरीने म्हटले. अटकेनंतर दोघांची विचारपूस केली जाईल आणि योग्य ती कारवाई होईल, असा विश्वास तिने व्यक्त केला. तसेच, ज्यांनी-ज्यांनी वैष्णवीला त्रास दिला त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही तिने केली.
मयुरीने पुढे सांगितले की, “माझ्या मिस्टरांनी सुशील हगवणेंनी फरार न होता समोर येऊन सगळं सांगितलं असतं, माझा याच्याशी काही संबंध नाही असं ते समोर येऊन बोलले असते, तर नक्कीच ते यातून बाहेर पडले असते, किंवा त्यांना अटक झाली नसती. जे सूत्रधार आहे ते तर मीडियासमोर आलेले आहेत.” तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली असती, तर आज हे प्रकरण घडले नसते, असेही तिने म्हटले. “जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं, तेव्हा तो निलेश चव्हाण आमच्या घरी येताना दिसायचा. आधी मला माहिती नव्हती की ते कोण आहे, काही काळानंतर मला कळालं तो माझी नणंद करिष्माचा जवळचा मित्र आहे. जेव्हा-जेव्हा आमच्या घरी भांडण व्हायची माझ्या बाबतीत किंवा इतर वेळी तेव्हा-तेव्हा तो मध्ये असायचा,” असेही मयुरी जगतापने पुढे सांगितले.
वैष्णवी आत्महत्या प्रकरणात आपल्या पती सुशील हगवणे यांना गोवण्यात आले आहे, असा स्पष्ट दावा मयुरीने केला. “माझा नवरा सुशील हगवणे यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही,” असे ती म्हणाली. लवकरच अजित पवार यांची भेट घेणार असल्याचेही तिने सांगितले. मयुरीने यापूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यात कारवाई झाली असती तर वैष्णवी आज आपल्यात असती, अशी खंतही तिने व्यक्त केली. महिला आयोगाने त्यावेळी कारवाई केली पाहिजे होती, असे मतही तिने मांडले. जालिंदर सुपेकर यांच्या नावाची धमकी दिली जात होती आणि निलेश चव्हाण गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, अशी माहिती देखील मयुरी हगवणेने दिली आहे.
राजेंद्र-सुशील यांना अटक
वैष्णवी हगवणे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निलेश चव्हाणचा इतिहासही स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा राहिला आहे. स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेश चव्हाणवर २०१९ साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल झाला आहे.
या प्रकरणाबद्दल बोलायचे झाल्यास, सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) हिने १६ मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. फरार असलेले सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे यांनाही आज अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे राज्य कार्यकारिणी सदस्य होते. वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली होती. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणे, शारीरिक आणि मानसिक त्रास देणे सुरू केले होते. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.
Title : Vaishnavi’s Sister-in-Law Reacts to Arrests, Will Meet Ajit Pawar






