Vaishnavi Hagawane Case | वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी सासू लता हगवणे, पती शशांक, नणंद करिश्मा यांना अटक केली असून, आज (२३ मे) पहाटे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनाही ताब्यात घेण्यात आलं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान करत या प्रकरणात मकोका लावला जाईल का यावर भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, “छळ करून आत्महत्या करायला लावणं सहन केलं जाणार नाही. पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे आणि ही कारवाई लॉजिकल एंडपर्यंत नेण्यात येईल. मकोका लावण्यासाठी विशिष्ट कायदेशीर निकष असतात. हे प्रकरण त्या निकषांत बसत असेल, तरच मकोका लावला जाईल. मात्र सध्या तरी निश्चितपणे काही सांगता येणार नाही.”
“२१व्या शतकात सून-मुलींवर अन्याय हा पाप”; फडणवीसांचा संताप :
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “२१व्या शतकात सून आणि मुली यांच्यात फरक करणं चुकीचं आहे. कोणत्याही स्त्रीला अन्यायकारक वागणूक देणं हे अक्षम्य पाप आहे. हगवणे कुटुंबात जे घडलं ते अत्यंत वेदनादायक आहे.” सध्या याप्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे आणि पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असंही ते म्हणाले.
या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असलेलं लग्नही चर्चेचा विषय ठरलं आहे. यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “अजित पवार यांचं या प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध नाही. कोणतंही कुटुंब लग्नाला बोलावतं, तेव्हा आपण जातो. त्यानंतर पुढे काय घडणार, हे कुणालाही माहीत नसतं. त्यामुळे या विषयाला अनावश्यक फाटे न फोडणं योग्य ठरेल.”
Vaishnavi Hagawane Case | तपासाच्या पुढील टप्प्यावर लक्ष :
पोलिसांच्या माहितीनुसार, हगवणे प्रकरणात तपास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सर्व पुरावे गोळा केले जात आहेत. दोषारोप सादर करून संपूर्ण प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमधून लॉजिकल एंडला नेण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
फडणवीसांच्या विधानामुळे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष हगवणे कुटुंबावर मकोका लावला जाईल का, याकडे लागलं आहे. वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यामागे घरगुती छळ, हुंडाबळी व मानसिक अत्याचार असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.






