Vaishnavi Hagawane | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे निकटवर्तीय आणि मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, आता या प्रकरणाला नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. वैष्णवीची (Vaishnavi Hagawane) मैत्रिणीसोबतची चॅट आणि ऑडिओ क्लिप समोर आली असून, ‘कामवालीचं मॅटर झालं, तिची लफडी बाहेर आली अन् मला मारलं,’ असे वैष्णवी यात आपल्या मैत्रिणीला सांगत आहे. या संवादात, आपण लग्न करून मोठी चूक केल्याचेही ती स्पष्टपणे सांगताना दिसते.
ऑडिओ आणि चॅट आता समोर-
वैष्णवी हगवणेने तिला नेमका काय जाच झाला, हे स्वतःच एका मैत्रिणीकडे सांगितले होते, ज्याची ऑडिओ आणि चॅट आता समोर आली आहे. या संवादात ती म्हणते, “आई-वडिलांना विरोध करून शशांकसोबत प्रेमविवाह केला, ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक होती. आता ही चूक सुधारण्यासाठी वडील माझी साथ देणार आहेत, लवकरच मी घटस्फोट घेणार आहे.” मात्र, घटस्फोट घेण्यापूर्वीच वैष्णवीवर टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आली, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
ऑडिओ क्लिपमधील धक्कादायक संवाद:
वैष्णवी: माहेर येण्याचं माझं कारण वेगळं आहे.
मैत्रीण: काय झालं बोलं?
वैष्णवी: मी डिव्होर्सचा विचार करत आहे. मी खूश नाही त्या माणसांसोबत, मला लय त्रास झालाय… यावेळी तर जास्तच झालं गं… त्यांच्या घरच्यांनी मला मारलं आणि त्यांनी पण मला मारलं… मी राहूच शकत नाही, खूप वैतागले गं…
मैत्रीण: का, पण काय झालं?
वैष्णवी: तेच कामवालीचं मॅटर… तिची लफडी बाहेर आली… मावशीने मला बरंच सांगितलं होतं फॅमिलीबद्दल… त्यांचं असं म्हणणं होतं की मी त्यांना साथ दिली बोलू लागयाला आणि मी वाटोळं केलं घराचंय… पण माझा काही संबंधच नव्हता… मी आलीये माहेरी, माझे वडील खूप चिडले आहेत सगळे.
मैत्रीण: पण तुझी काय चुकी यामध्ये… तुझा तर काहीच रोल नाही?
वैष्णवी: मी वैतागले खूप.
मैत्रीण: कोणी मारलं आणि तुला?
वैष्णवी: पिंकीने.
मैत्रीण: अगं, पण एवढं कोणी मारतं का गं असं?
वैष्णवी: माझ्यावरती पण आरोप करायला लागली.
मैत्रीण: पागलं झाले हे लोकं.
या संवादातून वैष्णवीला (Vaishnavi Hagawane) होत असलेला शारीरिक आणि मानसिक छळ स्पष्टपणे दिसून येतो. तिने कुटुंबात घडलेल्या एका वादामुळे तिला मारहाण झाल्याचे सांगितले आहे, तसेच तिच्यावर चुकीचे आरोप करण्यात आल्याचेही नमूद केले आहे.
दरम्यान, मयत वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये वैष्णवीला मृत्यूपूर्वी जबर मारहाण झाल्याचे समोर आले आहे. तिच्या कुटुंबीयांनीही हाच आरोप केला होता. वैष्णवीच्या मृतदेहावर बेदम मारहाण केल्याचे व्रण स्पष्ट दिसत असल्याने, राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वैष्णवीसोबत काही बरे-वाईट केले होते का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. पोलिसांना आता या प्रकरणाचा मारहाणीच्या दृष्टीनेही तपास करावा लागणार आहे. याप्रकरणी पती, सासू आणि नणंदेला अटक झाली असून, सासरे राजेंद्र हगवणे आणि दिर अजूनही फरार आहेत.






