Vaishnavi Hagawane | वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण समोर आलं आहे. आता फक्त वैष्णवीच नव्हे, तर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळावरही अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना अटक झाली असली तरी आता या बालकाबाबतच्या प्रकरणाचीही चौकशी होण्याची गरज समोर आली आहे.
कस्पटे कुटुंबियांनी सांगितल्यानुसार, वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळ त्यांच्या ताब्यात देण्यात आलं नव्हतं. जेव्हा वडील बाळाला आणण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावण्यात आलं. अखेर एका अनोळखी व्यक्तीने बाळ कसपटे कुटुंबियांच्या स्वाधीन केलं. मात्र, बाळाच्या प्रकृतीविषयी संशयास्पद बाबी समोर येऊ लागल्या आहेत.
झोपेचे इंजेक्शन? बाळाच्या कंबरेवर गाठ :
नऊ महिन्यांच्या जनकराजे नावाच्या बाळाच्या कंबरेवर एक गाठ असल्याचं कस्पटे कुटुंबियांच्या लक्षात आलं. बाळ अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांनी त्याला तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केलं. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बाळाला दोन-तीन दिवस झोपेचं इंजेक्शन देण्यात आलं असण्याचा संशय आहे. इतक्या छोट्या वयात अशा प्रकारचं औषध देणं ही गंभीर बाब आहे.
बाळाच्या चेहऱ्यावर आधी आनंद होता, पण त्याच्या शारीरिक स्थितीवरून गंभीर गोष्टींचा आभास होत असल्याचं कस्पटे कुटुंबीयांनी सांगितलं आहे. या गोष्टीने जनतेच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली असून, या प्रकरणात बालकांवर झालेल्या गैरवर्तणुकीची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
Vaishnavi Hagawane | बाळासोबत त्या चार दिवसांत काय घडलं? :
बाळाला अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आल्याचा संशय आहे. काही नातेवाइकांकडे ठेवून, नंतर अनोळखी व्यक्तीच्या हस्ते बाळ कस्पटेंकडे सुपूर्त करण्यात आलं. त्या दरम्यान बाळाच्या आरोग्यावर काय परिणाम झाला, त्याला काय दिलं गेलं, कोणत्या मानसिक व शारीरिक तणावाला तो बळी पडला? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणात बालकलाच शिकार करणाऱ्या निर्दयी मानसिकतेचा पर्दाफाश होण्याची गरज आहे, असं वैष्णवीच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.






