UPI Payment New Rule | भारतामधील डिजिटल व्यवहार सोप्पं करत असलेल्या UPI सेवेत १ ऑक्टोबर २०२५ पासून एक महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने पर्सन-टू-पर्सन (P2P) कलेक्ट रिक्वेस्ट फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मित्र, नातेवाईक किंवा सहकाऱ्यांकडून पैसे मागण्यासाठी वापरले जाणारे “रिक्वेस्ट मनी” पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार नाही.
UPI मुळे आज व्यवहार सोपे, सुरक्षित आणि वेगवान झाले आहेत. एका क्लिकवर काही सेकंदात हजारो रुपयांची देवाणघेवाण करता येते. मात्र, काही फसवणूक करणाऱ्यांनी याच फीचरचा गैरवापर केल्यामुळे NPCI ने हे फीचर्स रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित होतील, परंतु वापरकर्त्यांना त्यांच्या रोजच्या जीवनात थोडे बदल करावे लागतील. (UPI Payment New Rule)
कलेक्ट रिक्वेस्ट बंद होण्यामागचे कारण काय? :
कलेक्ट रिक्वेस्ट म्हणजे कोणाकडून थेट पैसे मागण्याची सोय. उदाहरणार्थ, एखाद्या मित्राकडून तुम्हाला १०००₹ घेण्यासाठी फक्त त्याचा UPI आयडी टाकून रिक्वेस्ट पाठवता येत असे. मित्राने ती मंजूर केली की पैसे तुमच्या खात्यात जमा होत. परंतु या सुविधेचा गैरवापर वाढू लागला. फसवणूक करणारे बनावट रिक्वेस्ट पाठवून लोकांकडून पैसे उकळत होते. NPCI ने यापूर्वी या रिक्वेस्टसाठी २०००₹ ची मर्यादा ठेवली होती, मात्र फसवणुकीच्या घटना कमी झाल्या नाहीत. शेवटी हे फीचर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला गेला.
हा बदल सामान्य ग्राहकांवर थेट परिणाम करणार आहे. उदाहरणार्थ, मित्रांसोबत जेवणाचे बिल शेअर करताना आता “रिक्वेस्ट” फीचर वापरता येणार नाही. त्याऐवजी मित्रांना थेट पैसे पाठविण्यास सांगावे लागेल. दैनंदिन छोट्या-छोट्या व्यवहारात त्यामुळे अडचणी वाढतील.
व्यापाऱ्यांसाठी ही सेवा सुरूच राहील :
पण, व्यापाऱ्यांसाठी ही सेवा सुरूच राहील. IRCTC, Amazon, Flipkart किंवा Netflix सारख्या प्लॅटफॉर्म्सकडून तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट येत राहतील. म्हणजेच, ऑनलाईन शॉपिंग, सब्सक्रिप्शन किंवा तिकीट बुकिंगसारख्या सेवांवर याचा परिणाम होणार नाही. (UPI Payment New Rule)
यामागचा मूळ उद्देश म्हणजे डिजिटल व्यवहार सुरक्षित ठेवणे. ग्राहकांनीही आता अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणाला पैसे पाठवत आहोत ते तपासणे, संशयास्पद रिक्वेस्ट टाळणे आणि फक्त विश्वसनीय व्यक्तींनाच पेमेंट करणे, हे नियम पाळले तर फसवणूक मोठ्या प्रमाणात टाळता येईल.
NPCI च्या या निर्णयामुळे वापरकर्त्यांना काही प्रमाणात गैरसोय होणार असली तरी दीर्घकालीन दृष्टीने हे पाऊल फायदेशीर ठरणार आहे. UPI व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि फसवणूकमुक्त करण्यासाठी हे पाऊल आवश्यक होते. आता ग्राहकांनी फक्त थोडे सावधगिरीने व्यवहार करायचे आहेत. कारण, आपले पैसे सुरक्षित ठेवणे हाच या बदलाचा मुख्य उद्देश आहे.






