‘हातावर सुसाईड नोट लिहून…’; डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर उज्ज्वल निकम यांची मोठी प्रतिक्रिया

On: October 26, 2025 10:49 AM
Satara Doctor Suicide
---Advertisement---

Satara Doctor Suicide |  सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी दोन्ही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली असून, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर असा प्रसंग ओढवणे आणि तिने हातावर सुसाईड नोट लिहून जीवन संपवणे हे अत्यंत धक्कादायक असल्याचे ते म्हणाले.

उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी फलटण डॉक्टर आत्महत्या (Phaltan Doctor Death case) प्रकरणावर बोलताना सखोल चौकशीची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, “फलटणच्या घटनेबाबत पोलीस तपास करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे, हे योग्यच आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.”

“एका वैद्यकीय स्त्री अधिकाऱ्यावर असा दुर्दैवी प्रसंग ओढवणे आणि तिने स्वतःच्या हातावर नोट लिहून स्वतःला संपवून घेणे, ही बाब धक्कादायक आहे,” असे निकम यांनी नमूद केले. सातारा पोलीस लवकरच सखोल चौकशी करून आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. डॉ. संपदा मुंडे (Dr. Sampada Munde) यांनी आत्महत्येपूर्वी हातावर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने (PSI Gopal Badne) याने चार वेळा अत्याचार केल्याचा आणि प्रशांत बनकर (Prashant Bankar) याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.

Satara Doctor Suicide | आरोपींच्या अटकेचा घटनाक्रम

आत्महत्येच्या घटनेनंतर तब्बल ३६ तास दोन्ही आरोपी फरार होते, ज्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाली केल्या. शनिवारी पहाटे पोलिसांनी पुण्यातील (Pune) एका फार्महाऊसवरून प्रशांत बनकरला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा (११ च्या सुमारास) दुसरा मुख्य आरोपी, निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने, स्वतःहून पोलिसांना शरण आला. वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना त्याने माध्यमांशी बोलताना, “माझा कोर्टावर आणि कायद्यावर विश्वास आहे,” असे म्हटले. आज, रविवारी, बदनेला न्यायालयात हजर केले जाणार असून, न्यायालय काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दोन्ही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असल्याने तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

News Title- Ujjwal Nikam Reacts To Satara Doctor Suicide

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now