Uddhav Thackeray | छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या हंबरडा मोर्चा दरम्यान उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. गुलमंडीवरील जाहीर सभेत बोलताना ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते सरकारच्या दोन उपमुख्यमंत्रिपदांपर्यंत कठोर टीका केली. त्यांनी सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप करत स्पष्ट इशारा दिला की, “शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, तर शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत.”
“हंबरडा नव्हे, इशारा मोर्चा” :
ठाकरे म्हणाले, “हा हंबरडा मोर्चा नाही, हा इशारा मोर्चा आहे.” सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजना बंद केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. “शिवभोजन बंद, आनंदाचा शिधा बंद, एक रुपयात पिकविमा बंद — हे सर्व लोकहिताचे निर्णय थांबवून सरकारने जनतेशी अन्याय केला आहे,” असा आरोप ठाकरे यांनी केला.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावरही निशाणा साधला. “२०१४ साली शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं वचन दिलं होतं. आज २०२५ आली, पण शेतकऱ्यांच्या हातात काहीच नाही. नुकसान झालंय, तरी भरपाई नाही. मग हे सरकार कोणासाठी?” असा सवाल त्यांनी केला.
Uddhav Thackeray | “उपमुख्यमंत्रिपद संविधानात कुठंय?” :
सभा दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सरकारमधील दोन उपमुख्यमंत्रिपदांवरून सरकारला लक्ष्य केलं. त्यांनी थेट विचारलं, “विरोधी पक्षनेता नेमत नाही, कारण संविधानात तरतूद नाही म्हणता. मग उपमुख्यमंत्रिपद कुठं आहे संविधानात? दोन उपमुख्यमंत्री नेमण्याचा कायदा कुठे आहे?”
ठाकरे पुढे म्हणाले, “असंवैधानिक पद्धतीने दोन उपमुख्यमंत्री ठेवले आहेत. जर संविधानात विरोधी पक्षनेता पदाची तरतूद नसल्याचं सांगता, तर मग उपमुख्यमंत्रिपदही काढून टाका. आम्ही असं पद मान्य करणार नाही.” (Uddhav Thackeray)
ठाकरे यांनी या सभेत महायुती सरकारवर जनतेचा विश्वास गमावल्याचा आरोप करत सांगितलं, “पदं तुम्ही ठरवता, पण सत्ता जनतेकडे आहे. आम्ही पदावर नसू शकतो, पण जनतेच्या मनात आहोत. हे सरकार पाशवी बहुमतावर चालतंय, पण त्यांना आमच्या जनाधाराची भीती वाटते.”






