Guillain-Barre Syndrome | पनवेल (Panvel) परिसरात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या गिलेन बॅरी सिंड्रोम (Guillain-Barre Syndrome – GBS) या आजाराची दोन प्रकरणे समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शरीरातील मज्जासंस्थेवर परिणाम करणाऱ्या या आजारामुळे रुग्णांच्या हालचालींवर परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या असून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरही भर दिला जात आहे.
दोन रुग्णांमुळे आरोग्य विभागाची वाढली चिंता :
पनवेल महापालिकेच्या माहितीनुसार, जीबीएसचे दोन्ही रुग्ण महापालिका हद्दीबाहेरील रहिवासी आहेत. त्यापैकी एका तरुणावर यशस्वी उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मात्र, 71 वर्षीय एका महिलेवर नवीन पनवेलमधील खासगी रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत. या दोन घटनांनंतर आरोग्य विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
पहिला रुग्ण चौक परिसरातील रहिवासी असून तो एप्रिल महिन्यात जर्मनी (Germany) येथून सुट्टीसाठी विचुंबे येथे आला होता. त्यानंतर चौकजवळील वावंडळ गावात वास्तव्यास असताना त्याला अशक्तपणा जाणवू लागला. पुढे उभे राहणे, चालणे तसेच अन्न गिळण्यास अडचण निर्माण झाली आणि दोन्ही पायांमध्ये कमजोरी वाढू लागली. त्यामुळे 6 जून रोजी त्याला नवीन पनवेलमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आवश्यक उपचारानंतर 15 जून रोजी त्याला घरी सोडण्यात आले.
Guillain-Barre Syndrome | ताप, अशक्तपणा आणि हात-पाय सुन्न होण्याची लक्षणे :
दुसरी रुग्ण 71 वर्षीय महिला असून त्या मूळच्या कोकण (Konkan) भागातील रहिवासी आहेत. 26 मे रोजी त्या पनवेलमधील तक्का येथे नातेवाईकांकडे आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी चारधाम यात्रेला प्रस्थान केले. 12 जून रोजी त्या परतल्यानंतर 14 जूनपासून त्यांना सतत ताप, अशक्तपणा आणि अस्वस्थता जाणवू लागली. सुरुवातीला त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले, मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.
त्यानंतर त्यांच्या हात-पायांमध्ये बधिरपणा जाणवू लागल्याने त्यांनी 24 जून रोजी नवीन पनवेलमधील खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले असून सध्या त्यांची प्रकृती आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली आहे. या दोन प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता वाढवली असून प्रतिबंधात्मक उपायांसह नागरिकांनी कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






