TikTok India comeback | भारतामध्ये शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले TikTok 2020 पासून बंदी घालण्यात आलेले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कंटेंट क्रिएटर्स आणि कोट्यवधी युजर्स नाराज झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा टिक-टॉकच्या पुनरागमनाची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. यामुळे टिकटॉक प्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
टिकटॉक वेबसाईट पुन्हा सुरू झाल्याची चर्चा :
काही युजर्सनी अलीकडेच टिकटॉकची अधिकृत वेबसाईट तपासली असता ती मोबाईल आणि लॅपटॉपवर अॅक्सेस होत असल्याचे समोर आले. तथापि, अनेक युजर्सना अजूनही ही वेबसाईट उघडता येत नाहीये. त्यामुळे वेबसाईट सर्वांसाठी ओपन न करता टेस्टिंग फेजमध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (TikTok India comeback)
या घडामोडीमुळे टिकटॉक भारतात पुन्हा सुरू होणार का याबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र अद्याप कंपनीकडून किंवा भारत सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.
TikTok India comeback | 2020 मध्ये घातली होती बंदी :
भारत सरकारने डेटा प्रायव्हसी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव जून 2020 मध्ये टिकटॉकसह एकूण 58 चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्यावेळी भारतात टिकटॉकचे तब्बल 20 कोटी सक्रिय युजर्स होते. या बंदीनंतर हजारो तरुण कंटेंट क्रिएटर्सना मोठा फटका बसला होता.
सध्या टिकटॉकची वेबसाईट पुन्हा अॅक्सेस होऊ लागल्याने त्याच्या पुनरागमनाबद्दलच्या चर्चांना जोर आला असला तरी, कायदेशीर दृष्ट्या भारत सरकारची मंजुरी मिळाल्याशिवाय हे अॅप सुरू होऊ शकत नाही.
भारत-चीन संबंधांमुळे चर्चेला वेग :
अलीकडील काळात भारत-चीन संबंध सुधारताना दिसत आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी नुकतीच भारत भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या भेटींमुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सकारात्मक बदल होऊ लागल्याचे संकेत आहेत. (TikTok India comeback)
याच पार्श्वभूमीवर टिकटॉक भारतात परतण्याची शक्यता अधिक चर्चेत येत आहे. मात्र, डेटा सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






