Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही मागील शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली असून, या अंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येत आहेत.
या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट २०२४ मधील दोन्ही हप्ते त्याच वर्षी वितरित करण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण दहा हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२४ आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०२५ या दहा महिन्यांचा निधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. यातील एप्रिल महिन्याचा लाभ काही दिवसांपूर्वीच पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला आहे.
२ मे २०२५ रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा लाभ जमा झाल्यामुळे, आता मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न विचारला जात आहे.
दरम्यान, मे महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.
‘या’ महिलांना मिळणार ३ हजार रुपयांचा हप्ता
मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या हप्त्यासोबत काही महिलांना ३ हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, म्हणजेच दहावा हप्ता मिळालेला नाही, त्यांना दहावा आणि अकरावा, असे दोन्ही महिन्यांचे मिळून ३ हजार रुपये एकत्र दिले जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. मात्र, ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला आहे, त्यांना नेहमीप्रमाणे फक्त १५०० रुपयांचा हप्ता मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
२१०० रुपयांचा लाभ कधी मिळणार?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने लाडक्या बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना भविष्यात २१०० रुपयांचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळतील, असे महायुतीच्या अनेक नेत्यांनी सांगितले होते.
परंतु, आता सत्ता स्थापन होऊन बराच काळ लोटला तरीही २१०० रुपयांबाबत सरकारने कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील केवळ १५०० रुपयांचाच असणार आहे.
Title : Good News for Dear Sisters! These Women Will Get 3,000 with May Installment; Read Details






