आयपीएलसाठी ‘या’ विदेशी खेळाडूंचा भारतात परतण्यास नकार, वाचा कारणे

On: May 15, 2025 10:26 AM
IPL 2025
---Advertisement---

IPL 2025 | भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे स्थगित झालेली इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ आता पुन्हा सुरू होणार आहे. उर्वरित सामने १७ एप्रिलपासून खेळवले जाणार असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नवीन वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. मात्र, अनेक विदेशी खेळाडू आता मायदेशी परतले असून, त्यांनी पुन्हा भारतात येण्यास नकार दिला आहे. जाणून घेऊया कोणते आहेत हे खेळाडू आणि त्यांनी काय कारणे दिली आहेत:  (IPL 2025)

गुजरात टायटन्स:

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. जॉस बटलर, गेराल्ड कोएट्झी आणि कागिसो रबाडा या महत्त्वाच्या विदेशी खेळाडूंनी मात्र भारतात परतण्यास नकार दिला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी (डब्ल्यूटीसी) संघ जाहीर केला असून, या खेळाडूंना २६ मे पर्यंत मायदेशी परतण्याचे निर्देश दिले आहेत. जे खेळाडू डब्ल्यूटीसीचा भाग नाहीत, ते मात्र भारतात परतण्याची शक्यता आहे. राशिद खान, शेरफेन रदरफोर्ड आणि करीम जनत हे भारतात परतणार आहेत.

IPL 2025 | कोलकाता नाइट रायडर्स:

१७ तारखेला बेंगळुरूविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळणाऱ्या केकेआर संघातील सुनील नरेन, आंद्रे रसेल, रोव्हमन पॉवेल आणि ड्वेन ब्राव्हो हे खेळाडू दुबईत आहेत आणि ते लवकरच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, यष्टीरक्षक फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज मायदेशी परतला आहे, तर एनरिक नॉर्किया मालदीवमध्ये असून, हे सर्व खेळाडू परतणार असल्याची माहिती आहे.

सनरायझर्स हैदराबाद:

या संघातील हेनरिक क्लासेन, ईशान मलिंगा, कामिंदु मेंडिस आणि वियान मुल्डर यांच्या परतण्याबाबत अनिश्चितता आहे. कर्णधार पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड हे डब्ल्यूटीसी फायनलसाठी निवडले गेल्यामुळे त्यांच्या परतण्याची शक्यता कमी आहे. मात्र, सनरायझर्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यामुळे त्यांच्या येण्या-जाण्याचा संघावर फारसा परिणाम होणार नाही.

पंजाब किंग्स:

या संघात सर्वाधिक ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या खेळाडूंच्या परतण्यावर कोणताही आक्षेप घेतलेला नाही. जेवियर बार्टलेट, अजमतुल्लाह उमरजई आणि मिचेल ओवेन संघात परतणार आहेत, तर मार्कस स्टॉयनिस आणि आरोन हार्डी यांच्या येण्याची शक्यता आहे. मार्को यान्सेन आणि जोश इंग्लिस हे ११ जूनपासून सुरू होणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनल संघाचा भाग असल्याने त्यांच्या परतण्याबाबत संभ्रम आहे. मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि सहाय्यक प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन व जेम्स होप्स भारतातच आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू:

वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतग्रस्त असल्याने आणि डब्ल्यूटीसी संघाचा भाग असल्याने भारतात परतणार नाही. इंग्लंडचा फलंदाज जेकब बेथेल, वेस्ट इंडीजचा रोमारियो शेपर्ड आणि दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एनगिडी यांनीही परतण्यास नकार दिला आहे.

दिल्ली कॅपिटल्स:

प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित सामने महत्त्वाचे असताना, मिचेल स्टार्कने भारतात परतण्यास नकार दिला आहे. सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्क यांच्या परतण्याबाबतही अनिश्चितता आहे, तर ट्रिस्टन स्टब्स प्लेऑफच्या सामन्यांसाठी उपलब्ध नसेल.

मुंबई इंडियन्स:

रयान रिकेल्टन आणि कॉर्बिन बॉश हे डब्ल्यूटीसी संघाचा भाग असल्याने त्यांना २६ मे पर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघात सामील व्हायचे आहे. विल जॅक्सनेही भारतात येण्यास नकार दिला आहे. अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमान उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे.

English Title: These Foreign Players Refuse to Return to India for IPL 2025, Read Their Reasons

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now