Crime News | पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर मौन सोडले आहे. सूनेसोबतच्या संबंधांच्या आरोपांवर त्यांनी खुल्या मनाने प्रतिक्रिया दिली असून, संपूर्ण प्रकरण राजकारणाने प्रेरित असल्याचं ते म्हणाले. “अनेकदा पोलिसात तक्रार दाखल करुन समाधान शोधण्याचा प्रयत्न झाला. माझ्या कुटुंबाचं चरित्र खूप मोठं आहे. त्यांच्यावर लावण्यात येणारे आरोप हे केवळ राजकारणाने प्रेरित आहेत,” असं मुस्तफा यांनी सांगितलं.
“मुलाचं दु:ख केवळ एक पिता समजू शकतो”
माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे भावनिक झाले आहेत. “एका मुलाच्या मृत्यूचं दु:ख केवळ ज्याला मुलगा आहे, तोच समजू शकतो. माझा एकुलता एक मुलगा ३५ वर्षांचा होता. इतक्या मोठ्या धक्क्यामुळे मी मागचे सहा-सात दिवस कोणाचाही फोन रिसीव केला नाही. काही लोकांनी माझ्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं, पण मी घाबरणारा नाही. मी आता माझ्या मनातला पिता आणि सैनिक जागा केला आहे. सत्य सर्वांसमोर येईल,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. मोहम्मद मुस्तफा यांनी कौटुंबिक संघर्षाचा १८ वर्षांचा प्रवास उघड केला. “२००६ साली माझ्या मुलाने शाळेत असतानाच सॉफ्ट ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली. नंतर हेरॉईन आणि अखेरीस २०२४ मध्ये आईस पर्यंत पोहोचला. मनालीमध्ये एसिडच्या प्रयोगाने त्याच्या मेंदूचं आणि शरीराचं नुकसान झालं,” असं ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितलं, “मुलाच्या मानसिक स्थितीत कधी-कधी सायकॉटिक लक्षणं दिसायची. वास्तवात न घडलेल्या गोष्टी त्याच्या डोक्यात घडायच्या. ही केवळ ड्रग्जची सवय नव्हती, तर मानसिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक संघर्षाची गोष्ट होती.”
Crime News | कितीही चुका केल्या तरी मुलगा हा मुलगाच असतो
माजी डीजीपींनी घरात घडलेल्या घटनांवरही खुलासा केला. “२०१९ साली मुलाने एकदा खोलीत आग लावली होती. एकदा सुनेला खोलीत बंद केलं होतं. अनेकदा स्टाफ आणि कुटुंबासोबत हिंसक वर्तन केलं. मात्र, तरीही कुटुंबाने नेहमीच मुलावर प्रेम केलं, त्याला सहानुभूती दाखवली,” असं त्यांनी सांगितलं.
“माझी पत्नी २५ वर्षांपासून राजकारणात आहे. तिने नेहमी सत्य आणि न्यायाची बाजू घेतली आहे. माझी मुलगी आणि सून दोघींचंही चरित्र प्रत्येक आई-बापासाठी आदर्श आहे. माझ्या मुलाने चुका केल्या, पण आम्ही त्याला समजून घेतलं,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
शेवटी मुस्तफा भावनिक होत म्हणाले, “मुलगा मुलगा असतो, त्याची प्रत्येक चूक माफ असते. आम्ही पालक म्हणून त्याचं पालनपोषण केलं, त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला. पण तोच मुलगा हे जग सोडून गेला, तर ते दु:ख अकल्पनीय असतं.”






