मुंबईवर संकट घोंघावतंय, हवामान खात्याचा हाय अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा

On: May 24, 2025 3:47 PM
weather update
---Advertisement---
Mumbai Weather | मुंबई  (Mumbai ) आणि राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं कहर केला आहे. हवामान खात्यानं मुंबईसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय समुद्राला उग्र स्वरूप येण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईकरांना समुद्राच्या आसपास न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस :

राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं आहे. फळबागांनाही याचा फटका बसला आहे. दुसरीकडे चाकरमान्यांनाही दररोजच्या प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. हवामान खात्यानं आज पुन्हा एकदा अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

महापालिकेचं आवाहन :

आज रात्री 10 वाजण्याच्या सुमारास समुद्रात जोरदार भरती होणार असून 4 ते 5 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याच्या जवळ न जाण्याचा सल्ला दिला जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) यासाठी नागरिकांना पूर्वसूचना देत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

कोकण (Konkan) व गोवा (Goa) किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि तो पुढील 36 तासांमध्ये अधिक तीव्र होऊ शकतो. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, यंदाचा मान्सून वेळेपूर्वीच दाखल होण्याची शक्यता आहे. 25 मेपर्यंत केरळमध्ये (Kerala) मान्सून पोहोचेल आणि त्यानंतर हळूहळू तो संपूर्ण देश व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच सुमारे 107% पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

Title : Big warning for Mumbaikars: Sea is rough today, risk of heavy rain 

Join WhatsApp Group

Join Now