वढू गावातील दोन आजींचा दिलदारपणा; लेकराप्रमाणे सांभाळलेल्या गायी केल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना दान

On: September 30, 2025 3:14 PM
Marathwada Rain Havoc
---Advertisement---

Marathwada Flood | मराठवाड्यातील पूरस्थितीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेती उद्ध्वस्त झाली, घरे पाण्यात गेली तर हजारो कुटुंबं बेघर झाली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी महाराष्ट्रामधून अनेक हात पुढे येत आहेत. त्यात पुण्याजवळील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ असलेल्या वढू गावातील दोन सख्या मैत्रिणींनी दिलेला हात सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

कांताबाई शिंदे आणि संगीता शिवले अशा या दोन आजींनी आपल्या लेकरासारख्या जपलेल्या गायी शेतकऱ्यांना दान करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ‘लक्ष्मी’ आणि ‘दुर्गा’ नावाच्या या त्यांच्या गायी गरजू शेतकऱ्यांकडे युवा स्पंदन संस्थेमार्फत सुपूर्त केल्या जाणार आहेत. त्यांच्या या पावलाचं गावकऱ्यांसह संपूर्ण समाजाकडून कौतुक होत आहे.

लेकराप्रमाणे जपलेल्या अनमोल गायी केल्या दान

कांताबाई शिंदे आणि संगीता शिवले या दोघी मैत्रिणी वढू गावात गेल्या अनेक दशकांपासून राहत आणि शेतकरी जीवन जगत आहेत. सकाळपासून जनावरांची कामं, शेतीची धावपळ आणि घरगुती संसार या सगळ्यात त्या कायम एकमेकींच्या सोबत राहिल्या. जरी त्यांच्या शेतात फारसं पीक नसलं तरी त्यांचं मन मात्र आभाळाएवढं मोठं आहे. याच उदार मनाने त्यांनी आपल्या गायी दान करण्याचा निर्णय घेतला.

कांताबाई शिंदे म्हणतात, “एकेकाळी माझ्या घरात पाणी शिरलं होतं तेव्हा संसाराची पर्वा न करता मी सर्वात आधी माझ्या जनावरांना वाचवलं. आपली जनावरं किती महत्वाची असतात हे मला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे मी लेकरासारखी जपलेली माझी ‘लक्ष्मी’ गाय मराठवाड्यातील शेतकऱ्याला दान करतेय.”

तर दुसरीकडे, संगीता शिवले सांगतात, “वर्षभर कष्ट करून आम्ही जगतो, पण मराठवाड्यातील शेतकऱ्याने काही दिवसांच्या पावसात आपले सर्वस्व गमावले. पैसा देणं शक्य नाही मला, पण माझ्याकडे असलेल्या चार गायींपैकी एक गाय ‘दुर्गा’ मी दान करतेय. ती मला नक्कीच आठवेल, पण गरजू शेतकऱ्याकडे गेल्यावर तिची चांगली काळजी घेतली जाईल, याची मला खात्री आहे.”

या सगळ्याची सुरुवात झाली सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे. युवा स्पंदन संस्थेने सोशल मीडियावर पोस्ट टाकत मदतीसाठी आवाहन केलं होतं. ही पोस्ट शिंदे आजींच्या नातवाने पाहिली आणि आजीला दाखवली. आजीने क्षणाचाही विलंब न करता नातवाला गाय दान करण्यास सांगितलं. त्यानंतर संगीता आजींनीही पुढाकार घेतला. आता या दोन्ही गायी युवा स्पंदन संस्था मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे सुपूर्त करणार आहेत.

News Title-The kindness of two grandmothers from Vadhu village

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now