LIC CSK Investment l चेन्नई सुपर किंग्सने (CSK) केवळ मैदानात नव्हे तर शेअर बाजारातही (Share Market) जबरदस्त कामगिरी केली आहे. भारतीय जीवन विमा महामंडळाला (LIC) CSK मधील गुंतवणुकीवर तब्बल ₹1000 कोटींचा नफा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. CSK च्या शेअर मूल्याने विक्रमी उंची गाठल्याने LIC च्या तिजोरीत भर पडली आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील CSK ही आयपीएलमधील यशस्वी फ्रँचायझींपैकी एक आहे. 2008 मध्ये India Cements ने CSK विकत घेतली आणि LIC कडे India Cements चे 1.8 कोटी शेअर्स असल्यामुळे LIC अप्रत्यक्षरित्या CSK मध्ये भागधारक ठरली.
2014 च्या नियमबदलानंतर मिळाला थेट हिस्सा :
2014 मध्ये आयपीएलने फ्रँचायझींना स्वतंत्र कंपनी म्हणून नोंदवण्याचा नियम लागू केला. त्यामुळे CSK चे ‘चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेड’ मध्ये रूपांतर करण्यात आले. यामध्ये LIC ला थेट 6.04 टक्के हिस्सा प्राप्त झाला.
त्यावेळी CSK च्या अनलिस्टेड शेअर्सची किंमत फक्त ₹31 होती. मात्र 2024 मध्ये ती किंमत वाढून ₹223 पर्यंत गेली. त्यामुळे LIC ला गुंतवणुकीवर 6 पट परतावा मिळाला आणि अंदाजे ₹1000 कोटींचा नफा झाला.
LIC CSK Investment l CSK च्या कामगिरीचा LIC ला बंपर फायदा :
CSK च्या मैदानावरील कामगिरी, ब्रँड व्हॅल्यू आणि वाढलेल्या मीडिया राइट्समुळे फ्रँचायझीचे ब्रॉडकास्टिंग व स्पॉन्सरशिप उत्पन्न 150% ने वाढून ₹479 कोटी झाले. आर्थिक वर्ष 2023 मध्ये CSK ने ₹14 कोटी नफा कमावला होता, तर आर्थिक वर्ष 2024 मध्ये हा नफा थेट ₹201 कोटींपर्यंत पोहोचला – म्हणजेच 1365% वाढ.
धोनीच्या लोकप्रियतेमुळे CSK ला मुथूट ग्रुपसारख्या मोठ्या ब्रँड्सची स्पॉन्सरशिप मिळाली. आयपीएलच्या वाढत्या मीडिया राइट्समुळेही CSK च्या कमाईत लक्षणीय वाढ झाली. मैदानावरील परफॉर्मन्स, ब्रँड व्हॅल्यू आणि धोनीचा प्रभाव LIC साठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरला.






