Dasara Melava 2025 | शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय राहतो. पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला तरीही ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) दसरा मेळाव्याचं महत्त्व कमी झालेलं नाही. यंदा हा मेळावा खास ठरतोय कारण मुंबई महापालिका निवडणुका आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी वाढलेली जवळीक यामुळे हा मेळावा आणखी लक्षवेधी आहे. (Dasara Melava 2025)
मात्र, ठाकरे गटाचा दसरा मेळावा एका दिवसावर असताना, त्याच्या कथित खर्चावरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhey) यांनी ठाकरे गटावर ट्विटरवर जोरदार टीका केली. दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी तब्बल 63 कोटी रुपयांचा खर्च केला जात असल्याचे सांगितले गेले आहे.
केशव उपाध्ये यांचं ट्वीट :
केशव उपाध्ये यांनी ट्वीट (Tweet) करत म्हटलं की, ” नऊ हा ‘आकडा’ लाभदायक असल्याचे कुणीतरी सांगितल्यापासून उबाठाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात. निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज नऊ हवी, टक्केवारी नऊपेक्षा कमी नसावी, इतकेच काय, दोघा भावांमध्ये असलेल्या 36 च्या आकड्याची बेरीजही नऊ असावी याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाचा दसरा मेळाव्याचे नियोजनही 63 कोटींच्या घरात असणार आहे.
मेळाव्यासाठी तब्बल 63 कोटीचे नियोजन झाल्याचे या गटातील नेत्यानेच हर्षोल्हासित होत सांगितले. सभा ठिकाण, स्टेज सजावट, जाहिराती, सोशल मिडीया, त्याशिवाय लोकांना आणायला गाड्या, गाडीत बसून लोकांनी मेळाव्याला यावे म्हणून, शिवाय त्यांच्या वडापाव, चहापाण्याची व्यवस्था…, असं सगळं मिळून हे 63 कोटी लागणार आहेत.
Dasara Melava 2025 | नाकी नऊ आले म्हणतात ते हेच!!
या 63 कोटी मध्ये अतीवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती? किती घरे वसवली गेली असती?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना लोक स्वतःहून उत्साहात यायचे. तेव्हा सेना प्रमुखाचं विचारांच सोनं असायच. आता तशी परिस्थिती नाही! मागचे काही मेळावे आठवा… मिंधे, खंजीर, माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं ही रडगाणी ऐकायला एकट्या गटातून गर्दी पण गोळा होत नाही म्हणून 36 चा आकडा मोडून 63 ची गोळाबेरीज करण्याचा हा आटापीटा!!
रडगाण्याचे तेच बेसूर सूर आळवायला खरंच 63 कोटीचा मेळावा घ्यायची गरज आहे का? हवं तर उद्धव ठाकरेंच्या नावाने मराठवाड्यात मदत करा पण हे 63 कोटी महाराष्ट्राच्याच उभारणीत लावा…” असे ट्विट करत त्यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला.
महाराष्ट्राला काय विचार दिला? :
एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करताना संजय राऊत (sanjay raut) म्हणाले की, “प्रचंड पैशांचा वापर करुन लोक आणले जातील. अरे तुम्ही कोण? तुम्ही शिवसेना कधी स्थापन केली? तुम्ही महाराष्ट्राला काय विचार दिला? हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा तुम्ही कुठे होता?. कुठल्या गोधडीत मुतत होता?. जर कोणाला वाटत असेल की, आम्ही शिवसेनेची स्थापना केली, तर जन्माचे दाखले घेऊन या.
एक आरएसएस आणि दुसरा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा होणारा मेळावा हे सोडले, तर बाकीचे मेळावे होत असतात” अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
तसेच उद्या होणाऱ्या दशहरा मेळाव्यात ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असल्याचे संकेत संजय राऊत (Sanjay raut) यांनी दिले आहेत. त्यामुळे उद्याच्या मेळाव्याकडे सगळ्याच्या नजरा लागल्या आहेत.






