Manoj Jarange | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्टमुळे हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथे दोन गट आमने-सामने आले. एका व्यक्तीने जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या व्हिडिओबद्दल जाब विचारण्यासाठी जरांगे समर्थक गावात गेले असता बाचाबाची झाली आणि तणाव वाढला.
पोलिसांची तात्काळ धाव :
या प्रकरणी करुंदा पोलिस ठाण्यात (Karunda Police Station) तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ गावात शांतता प्रस्थापित केली. या घटनेनंतर जरांगे समर्थक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले आणि कठोर कारवाईची मागणी केली.
या घटनेची माहिती मिळताच हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी करुंदा पोलीस ठाण्यात धाव घेतली. जरांगे समर्थकांची मागणी मान्य करत पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यामुळे गावात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे.
Manoj Jarange | न्यायालयाचा दिलासा आणि जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया :
याच पार्श्वभूमीवर, नुकत्याच मुंबई उच्च न्यायालयाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधातील जनहित याचिका फेटाळून लावली, ज्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. हीच मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणावर बसले होते.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील म्हणाले, “आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. गोरगरिबांच्या बाजूने न्यायदेवता उभी राहाते. सरकारला त्यांची बाजू भक्कमपणे मांडावीच लागणार आहे.”






