Tahira Kashyap | अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांची पत्नी आणि लेखिका-दिग्दर्शिका ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) हिला पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. २०१८ मध्ये कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केलेल्या ताहिराने स्वतः सोशल मीडियावर ही बातमी शेअर करत पुन्हा नव्याने लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावरून ताहिराचा संदेश-
इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ताहिराने (Tahira Kashyap) आपल्या दुसऱ्या कॅन्सर प्रवासाची सुरुवात केली. तिने लिहिलं, “सात वर्षांच्या नियमित स्क्रिनिंगनंतर पुन्हा एकदा हाच अनुभव घ्यायचा आहे. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की नियमित मॅमोग्राफी करायला विसरू नका. माझ्यासाठी हा ‘राउंड २’ आहे आणि मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे.” या शब्दांत तिने स्वतःची तयारी व्यक्त केली.
View this post on Instagram
पोस्टसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “जेव्हा आयुष्य लिंबू देतं, तेव्हा त्याचं लिंबूपाणी करा. पण जेव्हा तेच लिंबू वारंवार तुमच्या चेहऱ्यावर फेकलं जातं, तेव्हा ‘काला खट्टा’ बनवा आणि शांतपणे ते प्या – कारण एकतर ते स्वादिष्ट असेल आणि दुसरं म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा तुमचं सर्वोत्तम देणार आहात.” तिच्या या सकारात्मक दृष्टिकोनाला प्रेक्षकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.
आयुष्मानसह चाहत्यांचा पाठिंबा-
ताहिराच्या (Tahira Kashyap) या पोस्टवर आयुष्मान खुरानाने “माय हिरो” अशी कमेंट करत आपला अभिमान व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते आणि सहकाऱ्यांनी तिच्या धैर्याला सलाम करत, “याहीवेळी तू नक्की जिंकाल,” अशा शब्दांत तिचं मनोबल वाढवलं आहे.
२०१८ साली ताहिराला प्रथमच ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. त्या लढ्यातून ती केवळ बाहेर आली नाही, तर इतर महिलांसाठी ती प्रेरणास्थान ठरली. तिने आपला संपूर्ण प्रवास उघडपणे शेअर करत जनजागृती केली. तिच्या शरीरावरील व्रणही तिने लपवले नाहीत. आता पुन्हा एकदा ती स्वतःच्या दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरविरुद्धची लढाई लढण्यासाठी सिद्ध झाली आहे.
२००८ साली आयुष्मान आणि ताहिरा विवाहबंधनात अडकले होते. त्यांना विराजवीर हा १३ वर्षांचा मुलगा आणि वरुष्का ही ११ वर्षांची मुलगी आहे. या कुटुंबासाठी हा काळ कठीण असला तरी ताहिराच्या धैर्याने सगळ्यांना प्रेरणा मिळत आहे.






