Swami Chaitanyananda Saraswati | श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संस्थेशी संबंधित असलेले स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी (Swami Chaitanyananda Saraswati) याने विद्यार्थिनींवर लैंगिक छळ केल्याचे आढळून आले आहे. ४ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थेच्या प्रशासक पी.ए मुरली यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यात आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकातील (EWS) विद्यार्थिनींचा छळ, फसवणूक आणि धमकावणे असे गंभीर आरोप नमूद करण्यात आले आहेत.
या तक्रारीनुसार स्वामी विद्यार्थिनींना रात्री उशिरा व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवत असे. त्यात खोलीत बोलावणे, परदेशी दौऱ्याचे आमिष दाखवणे आणि नकार दिल्यास नापास करण्याची धमकी देणे यांसारख्या अनेक बाबींचा समावेश होता. पीडितांच्या जबाबामधून आणि उपलब्ध चॅट्स मधून ही माहिती स्पष्ट झाली आहे.
कोणाचा होता यात सहभाग? :
या प्रकरणात संस्थेतील तीन महिला वॉर्डनचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. या वॉर्डन मुलींवर गप्प बसण्यासाठी दबाव आणत आणि त्यांच्या मोबाईल फोन मधून पुरावे डिलीट करण्यास भाग पाडत होत्या. एवढेच नाही तर तक्रार केली तर वस्तीगृहातून हाकलून देण्याची धमकी ही विद्यार्थिनींना दिली जात होती. त्यामुळे पीडित मुलींनी बराच काळ कोणालाही हे कळून दिले नाही. (Swami Chaitanyananda Saraswati News)
पोलिसांनी केलेल्या तपासात काही आणखी गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत. आश्रमातील अनेक दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग गायब असल्याचे आढळून आले असून, महत्त्वाचे व्हॉट्सॲप चॅट्सही डिलीट करण्यात आले आहेत. बाबा आणि वॉर्डन मिळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय घेण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी डीव्हीआर व विद्यार्थिनींचे मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.
Swami Chaitanyananda Saraswati | विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण :
दरम्यान, तक्रार दाखल होण्याच्या वेळी चैतन्यानंद हा लंडनमध्ये असल्याचे नोंदवले गेले. त्यानंतर त्याचे अखेरचे लोकेशन आग्र्याचे दिसले. तो एकाच जागेवर न थांबता, वारंवार ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना अटक करण्यात अडचणी येत आहेत. पोलिसांनी त्याच्यावर लुकआउट नोटीस जारी केली असून हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडसह अनेक राज्यात छापे टाकले जात आहेत.
या संपूर्ण प्रकरणाने विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता पोलिसांनी कारवाई करून आरोपींना शिक्षा दिली तरच पीडितांना न्याय मिळेल आणि भविष्यात अशा घटना टाळता येतील.






