राहुल नार्वेकरांना निलंबित करा अन् गुन्हा दाखल करा! ‘या’ बड्या नेत्याची मागणी

On: January 4, 2026 4:24 PM
Rahul Narvekar
---Advertisement---

Uddhav Thackeray | महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईत आज शिवसेना भवनात मनसे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा संयुक्त वचननामा जाहीर झाला. मात्र, या वचननाम्याच्या कार्यक्रमातच उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि निवडणूक आयोगावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका करत राजकीय खळबळ उडवून दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाल्याचा आरोप केला. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली घटनात्मक संस्था काम करत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला असून, विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप :

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर लोकशाहीचे नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप केला. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे केवळ नावापुरते अध्यक्ष असून, सभागृहाबाहेर ते सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. अध्यक्ष हे निष्पक्ष असायला हवेत आणि कोणत्याही प्रकारच्या पक्षीय प्रचारात सहभागी होता कामा नये, हा अलिखित नियम असतो. मात्र, नार्वेकरांनी हा नियम पायदळी तुडवल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

उमेदवारांचे संरक्षण काढून घेण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप करत, अशा प्रकारे अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या अध्यक्षांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. लोकशाहीच्या चौकटीत राहून काम न करणाऱ्या व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

Uddhav Thackeray | निवडणूक आयोगावरही घणाघात :

यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोग सध्या केवळ नाटक करत असल्याचा आरोप करत, निकाल राखून ठेवले असले तरी शेवटी ते सत्ताधाऱ्यांच्या बाजूनेच दिले जातील, असा दावा त्यांनी केला. हिंमत असेल तर निवडणूक आयोगाने संबंधित ठिकाणच्या निवडणुका रद्द करून दाखवाव्यात, अन्यथा आयोग सत्ताधाऱ्यांचा ‘गुलाम’ असल्याचे सिद्ध होईल, असा थेट इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

Gen Z मतदारांचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचा आरोप करत, साम-दाम-दंड-भेद या मार्गाने निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याने लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडत चालल्याची भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह :

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. निवडणूक निर्णय अधिकारी (RO) यांचे फोन रेकॉर्ड्स जाहीर का केले जात नाहीत, असा सवाल करत, सीसीटीव्ही फुटेजप्रमाणे हे रेकॉर्ड्सही डिलीट करण्यात आले आहेत का, असा संशय त्यांनी व्यक्त केला. न्यायालयात जाऊनही आता काय साध्य होणार, विश्वास ठेवायचा तरी कोणावर, असा सवाल उपस्थित करत त्यांनी संपूर्ण व्यवस्थेवरच अविश्वास व्यक्त केला. (Municipal Elections 2026)

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने आधीच राजकीय समीकरणे बदलली आहेत. संयुक्त वचननाम्यात मुंबईकरांना पारदर्शक कारभार, मूलभूत सुविधा आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे आश्वासन देण्यात आले असून, २९ महापालिकांच्या निवडणुकीत ही युती सत्ताधाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

News Title: Suspend Rahul Narvekar, File FIR: Uddhav Thackeray’s Sharp Attack on Speaker and Election Commission

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now