Suryakumar Yadav | भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना 21 जानेवारी रोजी नागपूरमध्ये रंगणार आहे. एकदिवसीय मालिकेत पराभवानंतर आता टीम इंडिया नव्या जोमात मैदानात उतरणार असून सूर्यकुमार यादव कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्याने संघ संयोजनाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
या सामन्याआधी सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) एक मोठा निर्णय घेतला असून त्याचा फायदा थेट इशान किशनला (Ishan Kishan) होणार आहे. तिलक वर्मा दुखापतीमुळे पहिल्या तीन सामन्यांना मुकणार असल्याने संघात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर खेळणार :
कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) स्पष्ट केले की, पहिल्या टी20 सामन्यात इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. विशेष म्हणजे, टी20 क्रिकेटमध्ये हा क्रमांक सामान्यतः सूर्य स्वतः सांभाळतो. मात्र इशानला संधी देण्यासाठी सूर्याने आपली जागा सोडत चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे सूर्यकुमार यादवचा संघभावना आणि खेळाडूंवरील विश्वास दिसून येतो. इशान किशनला या नव्या भूमिकेत कशी कामगिरी करता येते, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दोन वर्षांनंतर टी20 संघात कमबॅक करणाऱ्या इशानसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
Suryakumar Yadav | तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यर संघात :
दुखापतीमुळे तिलक वर्मा पहिल्या तीन टी20 सामन्यांना अनुपस्थित राहणार असल्याने संघात श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला आहे. मात्र पहिल्या सामन्यासाठी इशान किशनला प्राधान्य देण्यात आल्याने श्रेयसला प्लेइंग इलेव्हनसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जर श्रेयसला संधी मिळाली असती, तर सूर्यकुमार यादव तिसऱ्याच क्रमांकावर खेळला असता. मात्र इशानसाठी स्थान सोडण्याचा निर्णय घेत सूर्याने आपल्या नेतृत्वगुणांचे दर्शन घडवले आहे. त्यामुळे भारतीय संघात नव्या फलंदाजी क्रमाने काय परिणाम होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






