‘आम्हाला आधीच अंदाज होता की पाकिस्तान…’; सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा

On: September 30, 2025 5:17 PM
Suryakumar Yadav
---Advertisement---

India vs Pakistan | आशिया कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडियाने रविवार २८ सप्टेंबर रोजी ऐतिहासीक विजय मिळवला. पाकिस्तान सोबतच्या या अंतिम सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सोमवारी मुंबईत दाखल झाला. देवनार येथील त्याच्या निवासस्थानी पोहोचताच नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांनी त्याचे जोरदार स्वागत केले. सोसायटीतील लोक, पदाधिकारी आणि परिसरातील नागरिकांनी शाल, पुष्पहार व तिरंगा देऊन त्याचा सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे जे त्याच्या सोसायटी मध्ये राहतात ते ही उपस्थित होते.

सूर्यकुमार यादवने निवासस्थानी आल्यानंतर राहुल शेवाळे यांच्या घरी विराजमान झालेल्या दुर्गामातेचे आशीर्वाद घेतले आणि चाहत्यांसोबत फोटोही काढले. त्याच्या स्वागत सोहळ्याला मोठी गर्दी जमली होती. “ट्रॉफी जिंकून घरी परतल्यावर नागरिकांकडून झालेलं स्वागत माझ्या मनाला सुखावणारं आहे,” असे तो म्हणाला. जवळपास २५ दिवस घरापासून दूर राहिल्यानंतर कुटुंबीयांसोबत मिळालेला हा क्षण त्याच्यासाठी खास असल्याचेही त्याने सांगितले.

भारत-पाकिस्तान सामन्यामधील काही गोष्टी

सूर्यकुमार यादवने भारत-पाकिस्तान सामन्यामधील तणावाबाबत स्पष्टपणे भाष्य केले. तो म्हणाला, “भारत-पाकिस्तान सामन्यात प्रेशर तर असतंच. पण मी ते च्युईंगम आणि स्माईलच्या आड लपवतो. तसेच सहकाऱ्यांशी गप्पा मारत राहतो, ज्यामुळे माझं दडपण कमी होतं.”

त्याने असे ही सांगितले की, पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंमध्ये वैफल्य जाणवत होते. पत्रकार परिषदांमध्ये त्यांच्या वक्तव्यांतूनही तोच सूर दिसत होता. त्यामुळे भारतीय खेळाडूंचं लक्ष विचलित होण्याची शक्यता होती. पण ड्रेसिंग रुममध्ये सर्वांनी एकत्र बसून ठरवलं की, “आपण फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं आणि बाकी सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करायच्या.”

“आम्हाला आधीच वाटत होतं, पाकिस्तान काहीतरी करेल. सुपर-४ मध्ये किंवा फायनलमध्ये त्यांच्या कडून काहीतरी घडेलच. पण आम्ही मात्र उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळण्यावर फोकस केला,” असं सूर्यकुमार म्हणाला. त्याने संघभावना आणि एकजुटीमुळेच विजय शक्य झाल्याचेही स्पष्ट केले.

याचबरोबर, त्याने मोठ्या दौऱ्यानंतर घरी परतण्याच्या आनंदाबाबतही सांगितले. विमानात असतानाच पत्नी सारखी फोन करून विचारत होती, “कुठे आलात? किती वेळात पोहोचणार?” त्यामुळे घरी आल्यानंतर झालेलं स्वागत त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरल्याचं तो म्हणाला.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात दबावात न येता खेळणं, ड्रेसिंग रुममधील एकजुटीचं वातावरण आणि मैदानावर दाखवलेलं कौशल्य या सगळ्यामुळे भारताचा विजय अधिक चांगला झाला.

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now