Supriya Sule | मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. काल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावर गेल्या होत्या. मात्र, भेटीनंतर बाहेर पडताना आंदोलकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी थेट त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या, तसेच गाडी अडवून नाराजी व्यक्त केली. या संपूर्ण प्रसंगानंतर आज सुप्रिया सुळे यांनी पुण्यातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आंदोलकांबद्दल सुळे यांची भूमिका :
सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “इतके मोठे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे काही घटना घडणे साहजिक आहे. तरुण मुलांच्या मनात काही भावना असतात. माझी नैतिक जबाबदारी असल्याने मी काल जरांगे पाटील यांना भेटायला गेले. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि थोडक्यात चर्चा केली.”
तसेच, आंदोलनाच्या ठिकाणी स्वच्छतेची मोठी समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. “माझी राज्य सरकारला आणि मुंबई महापालिकेला विनंती आहे की आंदोलनाच्या ठिकाणच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. पाऊस प्रचंड आहे, काही ठिकाणी वीज नाही, त्यामुळे आंदोलकांची गैरसोय होत आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
Supriya Sule | सरकारवर टीका व सर्वपक्षीय बैठकीची मागणी :
सुप्रिया सुळे यांनी थेट सरकारवर टीका करताना सांगितले की, “2018 मध्ये देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी आरक्षणाचा जो मार्ग सांगितला होता त्याची अंमलबजावणी करा. सलग अकरा वर्षे भाजपचे सरकार असूनही प्रश्न सुटलेला नाही. आज ज्यांच्याकडे आमदार-खासदार जास्त आहेत त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे.”
त्यांनी पुढे म्हटले की, “आंदोलनासाठी जबाबदार सध्याचे सरकार आहे. निर्णय घ्यायचा असेल तर सर्वपक्षीय बैठक बोलवा, अधिवेशन बोलवा आणि 24 तासांत निर्णय घ्या. गृहखात्याला जर आंदोलकांना रसद पुरवणाऱ्यांची माहिती असेल तर ती सार्वजनिक करा. नाहीतर सरकार अपयशी ठरेल.”






