Walmik Karad | बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून आरोपी असलेल्या वाल्मीक कराड (Walmik Karad) याला सर्वोच्च न्यायालयातून मोठा धक्का बसला आहे. जामिनासाठी त्याने केलेला अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने त्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार आहे. या निर्णयामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळी दिशा मिळाली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पार्श्वभूमी :
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा खून अत्यंत अमानुष पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच केला होता. खंडणीच्या वादातूनच ही हत्या झाल्याचा दावा करण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. सुरुवातीच्या टप्प्यात पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. गुन्हा दाखल करण्यास विलंब, तसेच मुख्य आरोपींवर कारवाई न झाल्यामुळे मोर्चे आणि आंदोलनही करण्यात आले होते.
या दबावानंतर तपासाला गती मिळाली आणि हळूहळू आरोपींची नावे समोर येऊ लागली. चौकशीदरम्यान वाल्मीक कराड (Walmik Karad) हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याच्यासह त्याच्या काही साथीदारांना अटक करण्यात आली. या सर्व आरोपींवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, वाल्मीक कराड आणि इतर आरोपींनी आपण निर्दोष असल्याचा दावा करत आरोप फेटाळले होते. सरकारी पक्षाने मात्र पुरावे आणि गुन्ह्याचे गांभीर्य दाखवत हा दावा अमान्य केला होता.
Walmik Karad | जामीनासाठी केलेले प्रयत्न आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय :
अटक झाल्यानंतर वाल्मीक कराड (Walmik Karad) याने सर्वप्रथम जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench of Bombay High Court) दाद मागितली. मात्र, खुनाचा प्रकार, उपलब्ध पुरावे आणि मोक्कासारख्या गंभीर कायद्याचा विचार करता उच्च न्यायालयानेही त्याला दिलासा दिला नाही.
यानंतर शेवटचा पर्याय म्हणून वाल्मीक कराडने सुप्रीम कोर्टात (Supreme Court of India) जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा अर्ज नामंजूर केला असल्याची माहिती संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी दिली. या निर्णयामुळे वाल्मीक कराडचा तुरुंगातील मुक्काम लांबला असून, त्याला मोठा न्यायालयीन झटका बसल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याबाबतही नवे दावे करण्यात आले आहेत. तो जिवंत असून तीन वेळा आपल्या गावी येऊन गेल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी सांगितले. कृष्णा आंधळे मोबाईल वापरत नसल्याने त्याचा ठावठिकाणा शोधणे कठीण जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.






