Sudarshan Ghule | मस्साजोग (Massajog) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुलेने सीआयडीकडे (CID) दिलेल्या जबाबात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. प्रतीक घुलेने देशमुख यांच्या तोंडावर लघवी केली, त्यानंतर छातीवर उडी मारल्याचे सुदर्शनने सांगितले आहे. त्याने विष्णू चाटे याच्याशी मोबाईलवर संवादही झाल्याचे मान्य केले आहे.
अपहरणाचा कट आणि अमानुष हल्ला
९ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्णा आंधळे, जयराम चाटे यांनी एकत्र येऊन सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्याचा कट आखला होता. कृष्णाने एक कार भाड्याने घेतली होती आणि सुदर्शनकडे आधीपासून काळ्या रंगाची जीप होती. देशमुख आणि त्यांचे मावसभाऊ कारमधून येत असताना दोन्ही गाड्यांनी त्यांना आडवले. त्यानंतर गाडीची काच दगडाने फोडून देशमुख यांना बाहेर ओढले.
सरपंच देशमुख यांना गॅस पाईपने मारहाण करण्यात आली, तर त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीस कोयत्याचा धाक दाखवण्यात आला. दुपारी ३ वाजता उमरी टोलनाक्यावरून त्यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर टाकळी शिवारात नेऊन अमानुषपणे मारहाण झाली. यामुळे देशमुख यांचा मृत्यू झाला.
गुन्ह्यांनंतरचे हालचाल आणि कारागृहातील तणाव
सुदर्शन घुलेने सांगितले की देशमुख यांना मारहाण केल्यानंतर ते निपचित पडले. मृत्यू झाल्याचा संशय आल्यामुळे त्यांना कपडे घालून गाडीत ठेवले आणि अंधार पडण्याची वाट पाहण्यासाठी तुरीच्या शेतात लपून बसले. अंधार झाल्यानंतर मृतदेह दैठणा फाटा येथे टाकून वाशीच्या दिशेने निघून गेले. हे सर्व त्यांनी वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून केल्याचेही कबूल केले.
दरम्यान, बीड (Beed) येथील कारागृहात वाल्मीक कराड, सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याच्या चर्चेने जोर धरला होता. त्यानंतर महादेव गित्तेसह गित्ते गँगच्या चार सदस्यांना हर्सूल कारागृहात हलवण्यात आले, तर मंगळवारी सकाळी आठवले गँगला नाशिक कारागृहात पाठवण्यात आले. कारागृह प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव ही हालचाल केल्याचे सांगितले आहे.






