Sudarshan Ghule | संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याने सीआयडीसमोर दिलेल्या जबाबात प्रतीक घुले याने देशमुख यांच्या तोंडावर लघवी केली आणि नंतर त्यांच्या छातीवर उड्या मारल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. तसेच खंडणीमध्ये अडथळा ठरू पाहणाऱ्याला दूर करा, असा आदेश वाल्मीक कराड (Valmik Karad) याने दिला होता, असेही त्याने स्पष्ट केले.
अपहरणाचा कट आणि अमानुष हल्ला-
सुदर्शन घुलेच्या (Sudarshan Ghule) मते, ९ डिसेंबर २०२४ रोजी प्रतीक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, सुधीर सांगळे आणि त्याने मिळून सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणाचा कट रचला होता. कृष्णा आंधळे याने एक कार भाड्याने घेतली होती, तर सुदर्शनकडे स्वतःची काळी जीप आधीपासून होती. उमरी टोलनाक्याजवळ देशमुख यांच्या कारची ओळख पटताच, एका गाडीने त्यांच्या कारला मागून आणि दुसऱ्या गाडीने पुढून अडवले. त्यानंतर दगडाने काच फोडून देशमुख यांना गाडीबाहेर काढून जबर मारहाण केली गेली.
या हल्ल्यात गॅस पाईपचा वापर करण्यात आला होता. मारहाणी दरम्यान प्रतीक घुलेने देशमुख यांच्या छातीवर उडी मारल्यावर त्यांना रक्ताची उलटी झाली, असे सुदर्शन घुलेने कबूल केले आहे. त्यानंतर देशमुख यांना सुदर्शनच्या गाडीत टाकून टाकळी शिवारात नेले गेले आणि पुन्हा एकदा मारहाण करण्यात आली. जेव्हा त्यांच्या मृत्यूची खात्री झाली, तेव्हा अंधाराची वाट पाहून दैठणा फाट्यावर त्यांचा मृतदेह टाकण्यात आला आणि आरोपी वाशीच्या दिशेने पसार झाले.
मृतदेहावर १५० हून अधिक जखमा-
देशमुख यांच्यावर इतकी अमानुष मारहाण झाली होती की त्यांच्या मृतदेहावर १५० हून अधिक जखमा असल्याचे उघड झाले आहे. मारहाण करताना वापरलेली हत्यारे, जसे की गॅस पाइप, क्लच वायर, लोखंडी पाइप, पीव्हीसी पाइप – ही सगळी तपास यंत्रणेकडे जमा करण्यात आली आहेत. या हत्यारांपैकी एका पाइपचे तब्बल सोळा तुकडे झाले होते, ज्यावरून हल्ल्याची तीव्रता स्पष्ट होते.
या हल्ल्यामुळे देशमुख यांच्या अंगावर अनेक खोल जखमा उमटल्या होत्या. संपूर्ण शरीर काळसर आणि निळसर दिसत होते. न्यायालयासमोर या हत्यारांची रेखाचित्रे सादर करण्यात आली असून, या साक्षांमुळे खटल्याला अधिक बळकटी मिळत आहे. सीआयडीकडून (CID) सुरू असलेल्या तपासात ही सर्व माहिती समोर आली असून, आरोपांच्या गंभीरतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.






