Santosh Deshmukh | सरपंच (Sarpanch) संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात जयराम चाटे याने केलेल्या कबुलीजबाबात, वाल्मीक कराडने सुदर्शन घुलेला सूड घेण्यास सांगितल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, आवादा एनर्जी कंपनीबाहेर चहा पिणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेला जबाब आता पोलिसांसाठी अत्यंत निर्णायक ठरत आहे.
सरपंच देशमुखांना धमकी व अपहरणाचा थरार-
याच दरम्यान, सरपंच देशमुख घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कंपनी बंद करू नये, गावातील बेरोजगारांना रोजगार मिळू द्यावा, अशी विनंती सुदर्शन घुलेकडे केली. मात्र त्याच्या उत्तरात सुदर्शनने सरपंचांना ‘तुला बघून घेईन, तुला जिवंत सोडणार नाही’ अशी उघड धमकी दिली होती, असे प्रत्यक्षदर्शीच्या जबाबातून समोर आले आहे.
या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा सुदर्शन घुलेने स्वत: केला आहे. त्यानुसार, उमरी टोलनाक्याजवळ सरपंचांची गाडी अडवण्यात आली. सुधीर सांगळेने वाहनाच्या काचेला दगड मारून गाडी थांबवली. यानंतर सुदर्शनने डाव्या बाजूचा दरवाजा उघडून सरपंचांना (Santosh Deshmukh) कॉलरने पकडत बाहेर ओढले. जयराम चाटेने चालक शिवराज देशमुख याला कोयत्याने धमकावले आणि संतोष देशमुख यांना मारहाण करत जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत बसवले. त्या वेळी स्कॉर्पिओ चालवणारा सुदर्शन घुलेच होता, हे त्याने तपास यंत्रणांना सांगितले आहे.
धनंजय देशमुख यांची मोठी मागणी
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना धनंजय देशमुख यांनी सांगितले की, त्यांच्या भावाचा (Santosh Deshmukh) खून हा फक्त वैयक्तिक वैर नाही, तर संघटीत गुन्हेगारीचे थेट उदाहरण आहे. त्यांनी यापूर्वीच म्हटले होते की अपहरण आणि हत्या करणारे सर्व आरोपी एकच आहेत.
धनंजय देशमुख यांनी सरकारकडे स्पष्ट मागणी केली आहे की, या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि संपूर्ण खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा. जेणेकरून लवकरात लवकर न्याय मिळू शकेल.






