Delhi Stampede | नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या मोठ्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. महाकुंभसाठी प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी स्टेशनवर (New Delhi Railway Station) होती आणि त्याचवेळी दोन वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांची एकसारखी नावे असल्याने संभ्रम निर्माण झाला. या गोंधळामुळे प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्यावर धावत जाऊ लागले आणि भयानक अपघात घडला.
रेल्वेच्या घोषणेमुळे झाला गोंधळ
दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेचा प्रमुख कारण दोन रेल्वेगाड्यांची नावे ‘प्रयागराज’ने (Prayagraj) सुरू होणे हे होते. प्लॅटफॉर्म १४ वर आधीच प्रयागराज एक्स्प्रेस (Prayagraj Express) उभी होती आणि त्याचवेळी प्लॅटफॉर्म १६ वर प्रयागराज स्पेशल ट्रेन येणार असल्याची घोषणा झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांना गोंधळ झाला आणि त्यांना वाटले की त्यांची गाडी बदलली आहे. या संभ्रमामुळे अनेक प्रवासी प्लॅटफॉर्म १४ वरून १६ कडे धावू लागले आणि चेंगराचेंगरी झाली.
त्याचवेळी, प्रयागराजकडे जाणाऱ्या एकूण ४ गाड्या होत्या, त्यातील ३ गाड्या उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांची गर्दी अनपेक्षितरित्या वाढली. याशिवाय, प्लॅटफॉर्म १३ वर दरभंगा जाणारी स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस होती, त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी गर्दी झाली होती.
फुटओव्हर ब्रिजवर प्रवाशांची गर्दी आणि मोठा अपघात
Delhi Stampede: शनिवारी रात्री हजारो प्रवासी प्रयागराजच्या विशेष गाडीची वाट पाहत होते. अचानक स्टेशनवर घोषणा झाली की प्लॅटफॉर्म १६ वर एक नवीन प्रयागराज स्पेशल ट्रेन येत आहे. हे ऐकून, अनेक प्रवाशांना वाटले की हीच ट्रेन प्रयागराजला परत जाणार आहे. त्यामुळे लोकांनी गोंधळात प्लॅटफॉर्म १४ वरून १६ कडे धावायला सुरुवात केली.
त्याचवेळी, फुटओव्हर ब्रिजवर आधीच मोठी गर्दी जमली होती. नवीन प्रवाशांनी गर्दी वाढवली आणि काहीजण खाली कोसळले. त्यामुळे मोठी चेंगराचेंगरी झाली, ज्यात १८ लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले.
या दुर्घटनेची (New Delhi Stampede) चौकशी सुरू असून, डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपास केला जात आहे. भारतीय रेल्वेने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी जाहीर केली आहे.
English Title: Stampede at Delhi Station Kills 18 Passengers






