ST Corporation | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि प्रवासी सेवा सुधारण्यासाठी, भविष्यात २५ हजार नवीन, स्वमालकीच्या बसेस खरेदी करण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केली आहे. या नवीन बसेसच्या संचालनासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार असून, त्याअनुषंगाने चालक तथा वाहक पदांबरोबरच इतर विविध वर्गातील पदांचीही येत्या काही वर्षांत एसटी महामंडळात भरती केली जाणार आहे.
भरती प्रक्रियेला मंजुरी
मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी महामंडळाच्या ३०७ व्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या नवीन पदभरतीच्या ठरावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, माननीय उच्च न्यायालयाने एसटी (ST) महामंडळातील नोकर भरतीला सन २०२४ पर्यंत मनाई केली होती. तथापि, येत्या काही वर्षांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी निवृत्त होणार आहेत, तसेच नवीन बसेसच्या संचालनासाठी अतिरिक्त कर्मचारी वर्गाची आणि अधिकाऱ्यांची निकड आहे. ही बाब लक्षात घेऊन, चालक तथा वाहक पदांसह इतर कर्मचाऱ्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
हा प्रस्ताव आता शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे. भविष्यात वाढणाऱ्या चालनीय बस (Bus) संख्येनुसार कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधाला (Staffing Pattern) मंजुरी घेण्यात येईल आणि त्यानुसार पुढील भरती (Recruitment) प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, असेही मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी स्पष्ट केले.
अभियंत्यांची रिक्त पदे
सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव जाणवत आहे. अनेक ठिकाणी चांगल्या शिक्षण अधिकाऱ्यांची आवश्यकता असून, विशेषतः भविष्यात सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागांच्या बांधकामासाठी बांधकाम विभागाला (Construction Department) कुशल अभियंत्यांची (Engineers) मोठी गरज भासणार आहे.
त्यामुळे, सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या (Engineers) जागा करार पद्धतीने (Contract Basis) आणि सरळ सेवा भरतीच्या (Direct Recruitment) माध्यमातून तातडीने भरण्यात येणार आहेत. या नवीन नोकर भरतीच्या (Recruitment) अनुषंगाने, एसटीच्या प्रत्येक विभागाने आपापल्या विभागातील रिक्त पदांचा फेरआढावा घेऊन, आवश्यक असणाऱ्या पदांची भरती (Recruitment) करण्यासंदर्भात एकत्रित मागणी सादर करावी, असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली. या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या (MSRTC) कामकाजात सुधारणा होऊन प्रवासी सेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
Title : ST Corporation To Recruit For 25000 New Buses






