दहावीच्या पोरांनो सावधान! कॉपी टाळण्यासाठी बोर्डाने घेतला मोठा निर्णय

On: February 18, 2026 5:40 PM
SSC Exam 2026
---Advertisement---

SSC Exam 2026 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत असून यंदा ही परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. अलीकडे बारावीच्या (HSC Exam) परीक्षेदरम्यान काही ठिकाणी कॉपीचे प्रकार उघडकीस आल्यामुळे मंडळाने दहावीच्या परीक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी गैरप्रकार टाळावेत आणि प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असा स्पष्ट संदेश देण्यात येत आहे.

यंदाच्या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी मंडळाने विविध पातळ्यांवर नियोजन केले आहे. परीक्षा केंद्रांवर नियंत्रण ठेवणे, देखरेख वाढवणे आणि गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई करणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

20 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान परीक्षा :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेंडसे यांनी पत्रकार परिषदेत दहावी परीक्षेची सविस्तर माहिती दिली. 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत परीक्षा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकूण नोंदणीकृत विद्यार्थ्यांमध्ये 8 लाख 65 हजार 740 मुलगे, 7 लाख 49 हजार 736 मुली आणि 13 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (SSC Exam 2026)

राज्यातील 26 हजार 683 शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून 511 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित केली जाणार आहे. परीक्षेच्या काळात कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्यात येणार आहे.

SSC Exam 2026 | कॉपीमुक्त अभियानासाठी विशेष उपक्रम :

कॉपी रोखण्यासाठी मंडळाकडून विशेष जनजागृती अभियान राबवले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना प्रामाणिक परीक्षेचा संदेश दिला जात आहे. 33 हजार शिक्षक, कर्मचारी आणि मुख्याध्यापकांना ई-मेल, एसएमएस व व्हॉट्सअॅपद्वारे सूचनाही पाठवण्यात आल्या आहेत. (SSC Exam 2026  Rules)

दरम्यान, 554 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही सुविधा नसल्याची माहितीही समोर आली आहे. बारावीच्या परीक्षेत वाशीम जिल्ह्यातील श्री मैनागिरी महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय टो-जुमडा येथे सामूहिक कॉपीचा प्रकार उघड झाल्यानंतर 26 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा अधिक कडक नियंत्रणाखाली घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

News Title: SSC Exam 2026 Maharashtra: 10th Board Exam to Be Copy-Free; Over 16 Lakh Students Registered

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now