Sonam Raghuwanshi | मेघालय येथील शिलाँग पोलीस (Shillong Police) गेल्या तीन दिवसांपासून गाजत असलेल्या राजा रघुवंशी (Raja Raghuvanshi) हत्याकांड प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांची चौकशी करत आहेत. या तपासात आता एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. शिलाँग पोलिसांनी मुख्य आरोपी सोनमला (Sonam) इंदूरहून गाझीपूरला सोडणाऱ्या कॅब ड्रायव्हर पीयूषचा जबाब नोंदवला आहे.
ड्रायव्हरचा जबाब आणि सोनमचा प्रवास-
कॅब ड्रायव्हर पीयूषने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रॅव्हल्स एजन्सीमार्फत त्याची अर्टिगा गाडी बुक करण्यात आली होती. ७ जून रोजी सकाळी आठच्या सुमारास तो इंदूरच्या लसूदिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीजवळ पोहोचला. तिथे सोनम बुरखा घालून आली आणि गाडीत एकटीच बसून गाझीपूरच्या दिशेने रवाना झाली.
इंदूरमधून निघाल्यानंतर सुमारे २५० किलोमीटरचा प्रवास केल्यावर त्यांनी एका धाब्यावर चहा-नाश्त्यासाठी गाडी थांबवली. मात्र, सोनम गाडीतून खाली उतरली नाही, ती गाडीतच बसून राहिली, असे पीयूषने सांगितले. पीयूषनेच तिला गाडीत चहा-नाश्ता आणून दिला. यावेळी सोनम खूप घाबरलेली दिसत होती, पण ड्रायव्हरने तिला कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. सोनमने त्याला गाझीपूर बायपासवर सोडण्यास सांगितले होते, जिथे पोहोचायला त्यांना संध्याकाळ झाली.
वाढता संशय आणि ‘मिस्ट्री गर्ल’चे गूढ-
पीयूषने सांगितले की, सोनमसोबत इतर कोणीही नव्हते. गाडीत पीयूषसोबत आणखी एक ड्रायव्हर होता आणि त्या दोघांनाही संशय आला होता. जेव्हा सोनम गाझीपूर बायपासवर उतरली, तेव्हा तिचा चेहरा दिसला आणि त्यांनी तिला ओळखले, कारण अनेक दिवसांपासून न्यूज चॅनलवर तिचा फोटो दाखवला जात होता. कोणत्याही कायदेशीर प्रकरणात अडकण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी सोनमला तिथेच सोडले आणि थेट इंदूरला परत आले. दुसऱ्या दिवशी सकाळी टीव्हीवर सोनमला अटक झाल्याची बातमी दिसली.
या प्रकरणात आता एका ‘मिस्ट्री गर्ल’चे नावही समोर आले आहे, जी सतत सोनमच्या संपर्कात होती. राजा रघुवंशीच्या हत्येची तिला पूर्वकल्पना होती का, याचा पोलिसांना संशय आहे. ही मुलगी सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. राजाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, ही मुलगी सोनमच्या योजनांबद्दल जागरूक होती आणि अनेकदा त्यांच्या घरीही आली होती. शिलाँग पोलीस या प्रकरणी एक-एक पुरावा गोळा करत असून, न्यायालयात केस कमजोर होऊ नये यासाठी भक्कम आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहेत.






