Pune News | पुण्यातील बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी नागरिकांसाठी गंभीर समस्या ठरत आहे. अरुंद रस्त्यांमुळे येथील रहिवाशी आणि वाहनचालक दैनंदिन जीवनात मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. या भागातील विकासाच्या जोरावर अनेक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या असल्या, तरी वाहतुकीची समस्या अद्याप सुटलेली नाही. (Baner Traffic)
स्थानिक नागरिकांच्या तक्रारींवर लक्ष देऊन माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बाबुराव चांदेरे यांनी महापालिकेच्या प्रशासनासोबत तातडीने पाहणी करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सकाळी बाणेर परिसरातील मुख्य चौक, हॉटेल पॅन कार्ड क्लब आणि धनकुडे वस्ती (Dhankude Wasti) परिसर येथे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम व माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
रस्ता रुंदीकरणामुळे नागरिकांना दिलासा :
पाहणी दरम्यान, महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, बाणेर परिसरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी रस्ता रुंदीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक जागा ताब्यात घेणे गरजेचे आहे.
महापालिकेने मूळ जागा मालकांशी सकारात्मक चर्चा करून त्यांना न्याय मोबदला देण्याचे आश्वासन दिले आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामात नागरिकांचे हित, पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया या तत्त्वांचे पालन करण्यात येणार आहे. या विकासानंतर रस्ता थेट मुंबई-बंगळुर राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे, ज्यामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि रहिवाशांना दैनंदिन कोंडीपासून दिलासा मिळेल.
Pune News | परिसराच्या विकासाला नवा वेग
पाहणीमध्ये परिसरातल्या सोसायट्यांमधील अनेक रहिवाशी जास्त संख्येने उपस्थित होते. त्याच बरोबर पुणे महानगरपालिकेचे पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ २ मधून संतोष वारुळे, सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, अधिक्षक अभियंता (पाणी पुरवठा) प्रसन्न जोशी, कार्यकारी अभियंता (बांधकाम) जयवंत पवार, अधिक्षक अभियंता (पथ विभाग) अभिजित आंबेकर, प्रकाश पवार, योगिता भांबरे, शिवानंद पाटील, यासह विविध महापालिका अधिकारी उपस्थित होते. त्यांनी रस्त्याच्या सद्यस्थितीचा अभ्यास करून रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक दिशा निश्चित केली. (Baner Traffic Solutuion)
बाबुराव चांदेरे म्हणाले की, “बाणेरसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या भागात पायाभूत सुविधा सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. रस्ते रुंद आणि सुरक्षित असतील तरच विकासाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो. ही प्रक्रिया फक्त वाहतूक कोंडीच सोडवणार नाही, तर परिसराच्या विकासाला नवा वेग देईल.”
बाणेर परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामानंतर नागरिकांना दैनंदिन वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिकेच्या या ठोस पावलामुळे बाणेरचा सर्वांगीण विकास गतीने पुढे जाणार असून, स्थानिक रहिवाशांच्या जीवनात सुधारणा होईल.






