‘तो’ धमकीचा मेल, घाणेरडे आरोप…; डॉ. वळसंगकरांच्या सुसाईड नोटमधून खळबळजनक खुलासा

On: April 21, 2025 5:19 PM
Dr. Shirish Valsangkar
---Advertisement---

Solapur  | सोलापूर येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. या नोटमध्ये त्यांनी आपल्या प्रशासकीय अधिकारी मनीषा माने (Manisha Mahesh Musale alias Manisha Mane) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी मनीषा माने यांना अटक करून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलीस आणि बचाव पक्षाने न्यायालयात वेगवेगळे युक्तिवाद केले आहेत.

मृत्युपत्रातील मजकूर

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, “ज्या माणसाला शिकवून मी आज ए.ओ. केले आणि चांगला पगार देतो आहे. त्याने खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे. त्याचे मला अतीव दुःख आहे. म्हणून मी माझे जीवन संपवत आहे.” या मृत्युपत्राच्या आधारावर पोलिसांनी मनीषा मानेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी न्यायालयात कोठडीची मागणी करताना सांगितले की, मनीषाने १७ एप्रिल २०२५ रोजी डॉ. वळसंगकर यांना पाठवलेल्या धमकीवजा ईमेलची प्रत जप्त केली आहे. मनीषाने डॉक्टरांवर नेमके कोणते खोटे व घाणेरडे आरोप केले होते, त्यामागे तिचा हेतू काय होता, तिला कोणी मदत केली का, आणि तिने डॉक्टरांना मानसिक त्रास देऊन आत्महत्येस कसे प्रवृत्त केले, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे. तसेच, आरोपीच्या हस्ताक्षराचे नमुने घ्यायचे असल्याचेही पोलिसांनी नमूद केले.

बचाव पक्षाचा युक्तिवाद

मनीषा माने यांचे वकील प्रशांत नवघीरे (Prashant Navgire) यांनी न्यायालयात वेगळा युक्तिवाद केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मनीषा २००८ पासून रुग्णालयात कार्यरत असून, सध्या प्रशासकीय अधिकारी आहेत. १७ एप्रिल रोजी तिने पगारात कपात होत असल्याने आणि आपली बदनामी होत असल्याने नाराजी व्यक्त करत, ‘मी आत्महत्या करेन’ अशा आशयाचा ईमेल डॉक्टरांना पाठवला होता. यानंतर डॉक्टरांनी तिला बोलावून घेतले असता, तिने त्यांची माफी मागितली होती. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी डॉक्टरांनी आत्महत्या केली, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

वकील नवघीरे यांनी युक्तिवाद केला की, इतक्या प्रतिष्ठित डॉक्टरने अशा कारणावरून आत्महत्या करणे संशयास्पद वाटते. मृत्युपत्रातील हस्ताक्षराची तपासणी आवश्यक आहे. मनीषा माने यांच्यावर हा खोटा गुन्हा दाखल केला असून, प्रकरणातील खरी वस्तुस्थिती बाहेर येऊ नये यासाठी हा प्रयत्न असू शकतो. मनीषावर आर्थिक गैरव्यवहाराचा कोणताही आरोप नसून, केवळ पगारातील कपातीबद्दल (एका दिवसाची पगार कपात) तिने ईमेलद्वारे नाराजी व्यक्त केली होती, असे बचाव पक्षाचे म्हणणे आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

Title : Solapur Doctor Suicide Note Revealed Accused Officer Remanded

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now