निलेश घायवळ प्रकरणी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!

On: October 14, 2025 10:50 AM
Nilesh Ghaywal
---Advertisement---

Nilesh Ghaiwal | पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळविरोधातील तपासात दिवसेंदिवस नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. आता पासपोर्ट प्रकरणातही मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही घायवळला पासपोर्ट मिळवून देण्यात आला होता, तोही खोट्या कागदपत्रांच्या आधारे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आता अहिल्यानगर पोलिस दलातील एका पोलिस निरीक्षकासह दोघांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.

पासपोर्ट मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर

नीलेश घायवळने २०१९ साली अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळवला होता. त्यासाठी त्याने खोटी कागदपत्रे आणि पत्त्याचे प्रमाणपत्र वापरल्याचे समोर आले आहे. त्या वेळी स्थानिक पोलिसांकडून त्याची पडताळणी करण्यात आली होती. मात्र, अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये तो आरोपी असतानाही त्याच्या नावावर ‘स्वच्छ’ पडताळणी अहवाल देण्यात आल्याने पोलिसांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने आडनावात फेरफार करून गुन्हेगारी नोंदींपासून आपले नाव सुटवले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित अहिल्यानगर पोलिसांनी दिलेल्या कागदपत्रांतही विसंगती आढळल्याने आता पुणे पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. डिएसबीमध्ये कार्यरत असलेल्या तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Nilesh Ghaiwal | पोलिसांच्या संगनमताचा संशय?

घायवळसारखा गुन्हेगार खोटी कागदपत्रे सादर करून पासपोर्ट मिळवू शकतो, हीच बाब पोलिसांच्या संगनमताकडे बोट दाखवणारी ठरत आहे. तपासात हे स्पष्ट झाले आहे की, स्थानिक पोलिसांकडून केलेल्या पडताळणीत जाणूनबुजून दुर्लक्ष झाले असावे. “डीएसबी” मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहित नसावी, असे होऊ शकत नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे चौकशीत अनेक नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या पुणे पोलिसांनी या प्रकरणातील सर्व कागदपत्रांची मागणी करून तपास सुरू केला आहे. पासपोर्ट पडताळणीच्या वेळी कोणती कागदपत्रे सादर झाली, ती कशी मंजूर झाली आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नवनवे गुन्हे समोर येत असून तपासाचा व्याप वाढला नीलेश घायवळच्या टोळीविरुद्ध अलीकडेच आर्थिक तपास आणि जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. त्यानंतर अनेक तक्रारदार पुढे येऊन नवीन तक्रारी दाखल करत आहेत. दुसऱ्या व्यक्तीचे सिमकार्ड वापरण्याचा प्रकारही समोर आला असून, त्यासंदर्भातही स्वतंत्र कारवाई होणार आहे. पासपोर्ट प्रकरणातील संशयास्पद बाबी आणि पोलिसांची भूमिका तपासात निर्णायक ठरणार आहेत.

या संपूर्ण प्रकरणामुळे नीलेश घायवळविरुद्ध आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपासात त्याला पासपोर्ट मिळवून देताना कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले, हे समोर आले तर अनेकांचे करिअर धोक्यात येऊ शकते. सध्या सर्वांचे लक्ष पुणे पोलिसांच्या चौकशीच्या पुढील टप्प्याकडे लागले आहे.

Title- Shocking revelation in passport case! Police help Nilesh Ghaywal to get passport?

Join WhatsApp Group

Join Now