Indore Couple Case Update | इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. आता आणखी एक खळबळजनक खुलासा झाला आहे, ज्यानुसार पत्नी सोनमने लग्नाच्या फक्त तीन दिवसांनंतर पती राजाला मारण्याचा कट रचला होता.
चॅटमधून खळबळजनक खुलासा
या हत्येच्या कटामागील कारण आणि सोनमच्या (Sonam Raghuvanshi )मानसिकतेवर प्रकाश टाकणारे राज कुशवाह आणि सोनममधील ‘चॅट्स’ आता समोर आले आहेत. या चॅटनुसार, सोनम लग्नाच्या तीन दिवसांनी राजाला मारण्याच्या प्लॅनबद्दल राज कुशवाहशी बोलली होती. लग्नानंतर सोनमला तिचा पती राजा रघुवंशीचे तिच्या जवळ येणे अजिबात आवडत नव्हते, असेही चॅटमधून स्पष्ट झाले आहे.
सोनमने राज कुशवाह याच्याशी केलेल्या चॅटमध्ये स्पष्टपणे लिहिले होते की, “माझा नवरा राजा माझ्या जवळ येत आहे, जे मला अजिबात आवडत नाही.” यावरून हे स्पष्ट होते की, सोनमने लग्नाआधीच राजा रघुवंशीपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत तिने राजाला मारण्यासाठी राज कुशवाहसोबत मेघालयला जाण्याचा प्लॅन केला. या हत्येसाठी मुद्दाम तिने हे ठिकाण ठरवले होते, कारण मेघालयसारख्या दुर्गम ठिकाणी गुन्हेगारी उघडकीस येणे कठीण होते असे तिला वाटले असावे.
सोनम आणि राजाचे ११ मे रोजी इंदूरमध्ये लग्न झाले होते. त्यानंतर २० मे रोजी ते हनिमूनसाठी मेघालयला गेले आणि २३ मे रोजी बेपत्ता झाले. २ जून रोजी राजाचा मृतदेह मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा परिसरातील धबधब्याच्या जवळ एका खोल दरीत कुजलेल्या अवस्थेत आढळला. राजाच्या शवविच्छेदन अहवालात त्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे, ज्यामुळे हत्येचा कट असल्याचे सिद्ध झाले.
व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, सोनम आणि राजाच्या लग्नाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लग्नातील एका विधीदरम्यान राजा सोनमला सिंदूर लावताना दिसत आहे.
यामध्ये राजाच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत असून तो खूपच जास्त आनंदी दिसत आहे. मात्र, सोनमचा चेहरा पडलेला पाहायला मिळत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नाहीत. या व्हिडिओवरून ती या लग्नामुळे खूश नसल्याचे स्पष्ट दिसून येते. या व्हिडिओ आणि चॅट्समुळे या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली असून, सोनमच्या मानसिकतेवर अधिक प्रकाश टाकला आहे.






