Maharashtra Politics | राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौर पदावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये महापौर कोण होणार, यावरून जोरदार चर्चा सुरू असून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडूनही दावा केला जात आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटात मोठ्या घडामोडी घडताना दिसत असून पक्षांतर्गत हालचालींमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
22 जानेवारी रोजी महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत होणार असून त्यानंतरच महापौर निवडीची प्रक्रिया अधिक स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याआधीच नगरसेवकांची फोडाफोडी रोखण्यासाठी सर्वच पक्ष सतर्क झाले आहेत. मुंबई महापालिकेसह काही महापालिकांमध्ये एकत्र लढलेल्या पक्षांमध्येही तणाव निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. (Maharashtra municipal elections)
ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात? :
कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून तेथेही महापौर पदासाठी राजकीय गणिते जुळवली जात आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे दोन नगरसेवक थेट शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटात खळबळ उडाली असून पक्ष नेतृत्वाने तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत.
या दोन्ही नगरसेवकांना ठाकरे गटाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला असून या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात तणाव निर्माण झाला आहे.
Maharashtra Politics | महापौर पदासाठी रस्सीखेच, सर्व पक्ष अलर्ट मोडवर :
मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदे गटाने आपल्या सर्व नगरसेवकांना सुरक्षित ठिकाणी ठेवत एकही नगरसेवक फुटणार नाही, याची काळजी घेतल्याची माहिती आहे. भाजप आणि शिंदे गटामध्ये पहिल्या अडीच वर्षांच्या महापौर पदावर एकमत न झाल्याने राजकीय समीकरणे अजूनही गुंतागुंतीची आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Shiv sena Shinde faction)
22 जानेवारीला आरक्षण सोडत झाल्यानंतर 30 जानेवारीपर्यंत महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, काही नगरसेवकांनी महापौर पदासाठी लॉबिंग सुरू केल्याचीही चर्चा आहे. सध्या महापौर पदावरून सर्वच महापालिकांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत असून राजकीय वातावरण तापले आहे.






