Pune | पुण्यातील शिवाजीनगर (Shivajinagar) येथील बस स्थानक (Bus Stand) विकसित करण्यासाठी महामेट्रो (Mahametro) आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ते करार तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रदिनी (Maharashtra Din) या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने वेगाने काम सुरू आहे.
शिवाजीनगर स्थानकाचा विकास आराखडा-
‘बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा’ (Public Private Partnership) (पीपीपी) या तत्त्वावर शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी प्रस्तावित आहे. बैठकीत बोलताना, अजित पवार म्हणाले, ‘शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा निर्णय पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महामेट्रो आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करावे.’
या प्रकल्पात महामेट्रो प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करणार आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या धर्तीवर स्वारगेट (Swargate) येथील बसस्थानक आणि मेट्रो स्थानकही विकसित करावे, अशी सूचना परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी केली.
Pune l स्वारगेट स्थानकासाठी प्रस्ताव-
‘शिवाजीनगर बस स्थानकाच्या धर्तीवर स्वारगेट येथील बस स्थानक व मेट्रो स्थानक विकसित करण्याबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सूचना केली आहे. येत्या आठ दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करा. शिवाजीनगर येथील बस स्थानकात दोन तळघर, चारचाकी वाहनांसाठी आणि बस स्थानकाचा तळमजला व व्यावसायिक साठी शॉपिंग मॉल आहेत. त्याचप्रमाणे स्वारगेट येथील बस स्थानकात अशा प्रकारच्या सुविधा असाव्यात, अशी सूचनाही राज्यमंत्री मिसाळ यांनी केली आहे,’ असे या बैठकीत सांगण्यात आले.
या बैठकीला अजित पवार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर आदी उपस्थित होते.






